ओटवणे / प्रतिनिधी
Magician Vaibhav Kumar awarded with Jadu Visharad and Jadu Bhushan Award!
राष्ट्रीय जादू परिषदेच्या ७ व्या भारतीय जादू संमेलनात गौरव
ओटवणे गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध युवा जादूगार वैभव कुमार (वैभव रामदास पारकर) यांनी जादू कलेच्या संवर्धनासह जादूच्या हजारो कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती व अंध श्रद्धा निर्मूलन केल्याच्या कार्याबद्दल त्यांना जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेच्या सातव्या भारतीय जादू संमेलनात राष्ट्रीय जादू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ भाऊसाहेब झोघडे यांच्याहस्ते या पुरस्काराने जादूगार वैभव कुमार यांना गौरविण्यात आले.जादुगार वैभव कुमार यांनी शालेय शिक्षणानंतर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन गोव्यातील ताज सारख्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी केली. परंतु त्यांचे या नोकरीत मन रमेना. कलेच्या माध्यमातून आपले देश विदेशात नाव व्हायला पाहिजे. हे त्यांचे लहानपणापासुन ध्येय्य होते. त्यात त्यांचे वडील रामदास पारकर प्रसिध्द मालवणी कवी, गायक तथा कलाकार त्यांनी वैभवकुमार यांना अनेक जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर, सुहानी, आनंद, पी सी सरकार, भैरव यांचे जादूचे प्रयोग दाखविले. त्याचवेळी महान जादूगार व्हायची वैभव कुमार यांनी महत्त्वाकांक्षा केली.
त्यानंतर वैभव कुमार यांनी जादूगार बनण्यासाठी भारतात ज्या ठिकाणी जादूचे प्रशिक्षण मिळते त्या सुरत, बंगलोर, हैद्राबाद – सिकंदराबाद, मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणी जाऊन जादू तज्ञांकडून जादूची विद्या संपादन केली. त्यानंतर महाराष्ट्रासह गोवा कर्नाटकात राज्यात गेली अनेक वर्षे जादूचे प्रयोग करून चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळेच आबालवृद्धांचे आवडते जादूगार म्हणून त्यांची ख्याती आहे. सामाजिक बांधिलकी जोपासताना त्यांनी दिव्यांग, वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरीक यांच्या संस्थेसाठी विनामूल्य कार्यक्रम केले.
शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह अनेक कार्यक्रम व उत्सवात जादूच्या हजारो कार्यक्रमातुन अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानातून जादू, भोंदू बाबांचे चमत्कार दाखवून समाज जागृतीचे कार्य केले. जादु कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र अपंग मित्र फेलोशिप संस्था, ग्लोबल मालवणी संस्था मुंबई, विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकॅडमीतर्फे राष्ट्रीय युवा जादुगार पुरस्कार, इंटरनॅशनल ह्यूमन राईट, जस्टिस फेडरेशन संस्थेतर्फे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार, जिव्हाळा सेवाश्रम ट्रस्ट, भीमगर्जना बौद्ध मंडळ अशा अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे.जादूगार वैभव कुमार यांना या कलेत जादूचे जागतिक प्रशिक्षक सतीश देशमुख, रत्नागिरीतील जादूगार कस्तुरे आणि विनय राज, अवधुत तसेच ऑल इंडिया मॅजिशियन ग्रुपचे सहकार्य लाभले. आता त्याना परदेशात जाऊन जादू कलेचे पुढील शिक्षण घ्यावयाचे असून परदेशात देखील जादूचे कार्यक्रम करून सिंधुदुर्गाचे नाव उज्वल करायचे आहे. तसेच भावी काळात मुलांना मोबाईल गेमच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक ठीकाणी जादूची कार्यशाळा घेऊन त्यांना उत्कृष्ट निवेदक व जादूगार घडविण्याचा त्यांचा मानस आहे.









