वयाच्या 77 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी कर्णधार आणि महान डावखुरे फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे सोमवारी वयाच्या 77 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. बेदी यांच्या पश्चात पत्नी अंजू, मुलगा अंगद आणि मुलगी नेहा असा परिवार आहे. सोमवारी सकाळी त्यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच त्यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र जंतुसंसर्ग होऊन तो पसरला आणि त्यातून नंतर ते ठीक होऊ शकले नाहीत, असे त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले.

1946 मध्ये अमृतसर येथे जन्मलेले बेदी हे भारतासाठी 67 कसोटी खेळले आणि त्यात त्यांनी एकूण 266 बळी घेतले. 14 वेळा त्यांनी पाच बळी, तर एकदा 10 बळी घेतले. ते भारतीय क्रिकेटच्या फिरकीपटूंच्या सोनेरी चौकडीचा भाग होते. त्यात इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांचा देखील समावेश होतो. बेदी यांनी 1966 ते 1978 दरम्यान एका दशकाहून अधिक काळ भारताच्या माऱ्यात मुख्य भूमिका बजावली.
बेदी काही काळ भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापकही राहिले होते. 1990 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर त्यांनी ही जबाबदारी पेलली. मनिंदर सिंग आणि मुरली कार्तिक यासारख्या अनेक प्रतिभावान फिरकीपटूंचे ते मार्गदर्शक राहिले आणि निवड समितीवरही त्यांनी काम केले. बिशनसिंग बेदी हे सर्वांत प्रशंसनीय भारतीय कर्णधारांपैकी एक राहिले आणि त्यांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्या निवृत्तीनंतर 1975 ते 1979 दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास चार वर्षे संघाचे नेतृत्व केले.
आयुष्यभर बेदी प्रस्थापितविरोधी राहिले आणि त्यांच्या मतांनी व विधानांनी अनेकदा वादांना जन्म दिला. दिल्लीच्या रणजी संघाचे ते सर्वांत जास्त काळ कर्णधार राहिले. 1974 ते 1982 पर्यंत त्यांनी नेतृत्व सांभाळले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघ एक मोठी शक्ती बनला. त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करणाऱ्या संदेशांचा वर्षाव झाला.
अनेक क्रिकेटपटूंकडून दु:ख व्यक्त
‘बेदी हे एक उत्कृष्ट गोलंदाज होते. त्यांचा क्रीज आणि अँगलचा वापर थक्क करणारा होता. त्यांना सामोरे जाण्याच्या कल्पनेनेच फलंदाज अनेकदा गांगरून जायचे. चेंडूला दिल्या जाणाऱ्या उंचीसह जवळजवळ प्रत्येक युक्ती त्यांच्याकडे होती’, असे प्रसिद्ध फिरकी चौकडीचा एक भाग राहिलेल्या चंद्रशेखर यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना सांगितले. माजी डावखुरा फिरकीपटू सुनील जोशीने म्हटले आहे की, हे माझ्यासाठी खूप मोठे नुकसान आहे. ते केवळ प्रशिक्षक नव्हते, तर एक मार्गदर्शक, पितासमान व्यक्ती होते. माजी सलामीवीर गौतम गंभीर, फिरकीपटू आर. अश्विन, बीसीसीआयचे माजी कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझऊद्दीन, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांनाही बिशनसिंग बेदी यांच्या निधनाची बातमी ऐकून जबर धक्का बसला आहे. त्यांची मैत्री 1971 पासून जुळली होती. अगदी अलीकडे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करतारपूर साहिब येथे बेदी व आलम पुन्हा एकत्र आले होते आणि त्यांनी जुन्या काळाच्या आठवणींना उजाळा दिला होता. ‘बेदी हे अर्थातच जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू होते, पण त्याहूनही जास्त ते चांगली व्यक्ती होते. मी सीमेपलीकडचा माझा सर्वांत जवळचा मित्र गमावला आहे’, अशी प्रतिक्रिया लाहोरहून आलम यांनी व्यक्त केली.









