क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
फोर लायन्स अकादमी पुणे आयोजित गोवा समर चषक निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत बेळगावच्या मॅजिक स्पोर्ट्स क्लबने सिद्धेश्वर एफसी गोवाचा 1-0 असा पराभव करुन गोवा समर चषक पटकाविला.
गोवा येथे खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिले सामने साखळी पद्धतीचे खेळविले गेले. पहिल्या सामन्यात मॅजिक स्पोर्ट्स क्लबने एफसी गोवा संघाचा 8-0 अशा फरकाने पराभव केला. या सामन्यात प्रज्वलने 3, ओमकारने 2, टिपू, विराट व सकलेन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या साखळी सामन्यात मॅजिक संघाने फोरलाईन्स पुणे संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 13, 17 व 28 व्या मिनिटाला प्रज्वलने तीन सलग गोल करुन स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रीक नोंदविली. शेवटच्या साखळी सामन्यात मॅजिकने सिद्धेश्वर एफसी गोवाचा 2-1 असा निसटता पराभव केला. मॅजिकतर्फे 13 व्या मिनिटाला ओमकारने तर 18 व्या मिनिटाला सकलेनने गोल केला. गोवातर्फे फ्रान्सीसने 23 व्या मिनिटाला गोल केला.
गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवन मॅजिक स्पोर्ट्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत मॅजिक स्पोर्ट्सने इंडस अल्टम पुणे संघाचा 3-0 असा पराभव केला. सातव्या मिनिटाला ओमकारच्या पासवर प्रज्वलने पहिला गोल केला. 19 व्या मिनिटाला सकलेनच्या पासवर प्रज्वलने दुसरा गोल केला तर 25 व्या मिनिटाला विराटच्या पासवर प्रज्वलने तिसरा गोल करुन स्पर्धेतील तिसरी हॅट्ट्रीक नोंदविली. अंतिम सामन्यात मॅजिक स्पोर्ट्स क्लब बेळगावने सिद्धेश्वर एफसी गोवाचा 1-0 असा निसटता गोल करुन विजेतेपद पटकाविले. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाचे गोल फरक कोरेच राहिले. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला ओमकारच्या पासवर प्रज्वलने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. सिद्धेश्वर संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण मॅजिक स्पोर्टसच्या भक्कम आघाडीफळीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले.
सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मॅजिक स्पोर्ट्स क्लबला आकर्षक चषक, सर्व खेळाडूंना पदके, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. प्रज्वलन लखन्नावरला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तर हसन नालबंदला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. या संघाला अखिलेश अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









