ममता बॅनर्जींची घोषणा, केंद्राविरोधात 6 ऑगस्टला आंदोलन
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेस 6 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करणार आहे. केंद्र बंगालला निधी देत नसल्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष केंद्राचा निषेध करणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले. तसेच पश्चिम बंगाल सरकार संपूर्ण राज्यात एक सर्वेक्षण करून त्याअंतर्गत मदरशांची नोंदणी केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारला सर्व मदरशांची नोंदणी करायची असून या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. सर्व्हेच्या माध्यमातून मुस्लीम मुला-मुलींना पुढील नोकरी आणि अभ्यासात अनेक सुविधा मिळू शकतील, असे त्या म्हणाल्या. ज्या मदरशांना या प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे ते घेऊ शकतात आणि ज्या मदरशांना सहभागी व्हायचे नाही त्यांनी येऊ नये असेही त्यांनी नमूद केले.
येत्या रविवारी केंद्राविरोधात एल्गार
रविवार, 6 ऑगस्ट रोजी संपूर्ण बंगालमध्ये दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन केले जाईल. या आंदोलनामध्ये शहरातील ब्लॉक स्तरापासून वॉर्ड स्तरापर्यंत निषेध करण्यात येईल. हा राजकीय निर्णय असून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याचेही ममतांनी स्पष्ट केले. सरकारवर हल्लाबोल करताना राज्याला निधी उपलब्ध होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.









