ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath Govt) 2003 पर्यंतच्या आलिया (इयत्ता 9 वी ते 10 वी) वर्गाच्या कायम मान्यता प्राप्त मदरशांचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक कल्याण विभागाने मांडलेल्या प्रस्तावावर सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला. (Madrasa grants canceled in Uttar Pradesh)
सध्या उत्तरप्रदेशात 16 हजार 461 मदरसे असून, त्यापैकी 560 मदरशांना सरकारी अनुदान मिळते. तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात 146 मान्यताप्राप्त मदरशांना अनुदान यादीत घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अनुदान यादीत 100 मदरसेही घेण्यात आले. 46 मदरशांचा अनुदान यादीत समावेश नाकारला गेला. नंतर काही मदरशांनीही न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उर्वरित 46 मदरशांनाही अनुदान यादीत घेतले. राज्यातील 560 मदरशांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानातून मदरशांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते.
2017 मध्ये योगी सरकार सत्तेत आले तेव्हा अनेक मदरशांनी मानकांची पूर्तता केली नाही. त्यामुळे मागील महिन्यात योगी सरकारने आधुनिक मदरसा योजनेअंतर्गत राज्यातील मदरशांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर योगी सरकारने राज्यातील सर्व मदरशांचे सरकारी अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच योगी सरकारने मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीताची सक्ती केली आहे.