कनिष्ठ अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे समाधान
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल गावामध्ये गेले आठवडाभर खंडित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे माडखोलवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत लक्षवेधुनही कोणतेही कार्यवाही न केल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह माडखोल विभागीय विज कार्यालय गाठून कनिष्ठ अभियंता श्री चव्हाण यांना याबाबत धारेवर धरीत जाब विचारला. यावेळी माडखोलवासियांच्या या रुद्रावतारामुळे अखेर श्री चव्हाण यांनी गावातील विजेच्या समस्या दोन दिवसात सोडवण्याचे तसेच पुन्हा गावात वीज समस्या होणार नाही याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले.
माडखोल गावात आठवडाभर विजेचा खेळ खंडोबा सुरू असून त्यात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे माडखोलवासिय अक्षरशः हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे या वीज समस्येमध्ये वाढच होत आहे. याबाबत अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले परंतु वीज वितरण कंपनीकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळेच संतप्त माडखोलवासीयांनी गावातील विभागीय वीज कार्यालयाला धडक देत कनिष्ठ अभियंता श्री चव्हाण यांच्यासमोर गावातील वीज समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कनिष्ठ अभियंता श्री चव्हाण यांनी गावातील विजेच्या समस्या दोन दिवसात सोडवण्याचे तसेच पुन्हा गावात वीज समस्या होणार नाही याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
यावेळी माडखोल सरपंच सृश्रण्वी राऊळ, उपसरपंच कृष्णा राऊळ, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मसाजी राऊळ, पांडुरंग राऊळ, अनंत राऊळ, योगेश लाड, बंटी सावंत, सुयोग राऊळ, श्री शेटकर, दादा धुरी, न्हानु राऊळ आदी माडखोल ग्रामस्थ उपस्थित होते.