पालकमंत्र्यांचे वेधणार लक्ष ; रवींद्र मडगावकर
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी- बेळगाव राज्य मार्गादरम्यान माडखोल गावातील राज्य मार्गाचे कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे पावसाळ्यात वाहन चालकांचे अक्षरशः कंबरडेच मोडले. त्यानंतर संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गाने पावसाळ्यानंतर रस्ता नुतनीकरणाचे काम हाती घेण्याची ग्वाही दिली. मात्र पावसाळा संपूनही अद्याप कोणतेही कार्यवाही न केल्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान रस्त्याच्या या दयनीय अवस्थेला संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असून याबाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांच्या बेजबाबदारपणा व नाकर्तेपणाचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे संबंधितांच्या असंवेदनशील कारभाराबाबत राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे भाजपाचे आंबोली मंडळ तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आणि माडखोल गावातून जाणाऱ्या या राज्य मार्गाची सध्या अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या नुतनिकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात उखडले. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. सदरचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न केल्यामुळे तसेच निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच पावसाळ्यात याचा फटका वाहन चालकांना बसला. याबाबत आवाज उठवल्यानंतर पावसानंतर पुन्हा डांबरीकरण करण्याची ग्वाही अधिकारी व ठेकेदार यांनी दिली होती.
मात्र पावसाळा संपला तरी अद्याप या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा पत्ताच नाही. पावसाळ्यात डांबरीकरण होऊ शकत नसल्यामुळे ग्रामस्थांनी खड्ड्यातूनच प्रवास करीत सर्व सहन केले. मात्र आता त्यांची सहनशीलता संपली असून या निकृष्ट दर्जाच्या कामाला संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गाचा बेजबाबदारपणा कारणीभुत आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणारे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.









