पेगुला, जेबॉर, सिनर, डी मिनॉर स्पर्धेबाहेर, रुबलेव्ह , झेंग किनवेन, वोन्डूसोव्हा, साबालेन्का यांची आगेकूच
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, अमेरिकेची मॅडिसन कीज, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह व आंद्रे रुबलेव्ह, चीनची झेंग किनवेन, झेकची मर्केटा वोन्ड्रूसोव्हा, साबालेन्का, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर जेसिका पेगुला, ऑन्स जेबॉर, यानिक सिनर यांचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त झाले.
चौथ्या फेरीत अनेक मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्याचे पहावयास मिळाले. विद्यमान विजेत्या अग्रमानांकित अल्कारेझने सुमारे दोन तासाच्या खेळात इटलीच्या जागतिक 61 व्या मानांकित मॅटेव अरनाल्डीचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव करून शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या मार्गावर असणाऱ्या अल्कारेझची उपांत्यपूर्व लढत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हशी होईल. तिसऱ्या मानांकित मेदवेदेव्हने ऑस्ट्रेलियाच्या 13 व्या मनांकित अॅलेक्स डी मिनॉरचे आव्हान 2-6, 6-4, 6-1, 6-2 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची त्याची ही चौथी वेळ असून 2021 मध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती.
अन्य सामन्यात आठव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने आगेकूच करताना ब्रिटनच्या जॅक ड्रेपवर 6-3, 3-6, 6-3, 6-4 असा विजय मिळविला. त्याची पुढील लढत त्याचाच देशवासी व मित्र मेदवेदेव्हशी होईल. जर्मनीच्या व्हेरेव्हने आगेकूच करताना 12 व्या मानांकित यानिक सिनरवर पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 6-4, 3-6, 6-2, 4-6, 6-3 अशी मात केली. ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची त्याची ही दहावी वेळ आहे. चार तास 41 मिनिटे ही झुंज रंगली होती. सिनरविरुद्ध त्याने आजवर पाचपैकी चारवेळा विजय मिळविला आहे.
महिला एकेरीत मानांकित खेळाडूंवर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आली. तिसऱ्या फेरीत जागतिक अग्रमानांकित व विद्यमान विजेती इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का बसला तर चौथ्या फेरीत अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलावरही तीच वेळ आली. पेगुलाला तिचीच देशवासी व मैत्रिण मॅडिसन कीजने केवळ 61 मिनिटांत 6-1, 6-3 असे हरविले. मॅडिसन कीजची पुढील लढत विम्बल्डन चॅम्पियन झेकच्या मर्केटा वोन्ड्रूसोव्हाशी होईल. नवव्या मानांकित वोन्ड्रूसोव्हाने अमेरिकेच्या बिगरमानांकित पेटॉन स्टीयर्न्सवर 6-7 (3-7), 6-3, 6-2 अशी मात केली. जेबॉरला आधीच्या दोन सामन्यातही तीन सेट्समध्ये झुंज द्यावी लागली होती. पाचव्या मानांकित ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरलाही स्पर्धेबाहेर पडावे लागले. तिला 23 व्या मानांकित 20 वर्षीय चीनच्या झेंग किनवेनकडून 6-2, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. चीनच्या वांग कियांगने यापूर्वी 2019 मध्ये या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीर्पंत मजल मारली होती. त्यानंतर झेंगने हा पराक्रम केला आहे. त्याआधी लि ना हिने 2013 येथील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यापुढील वर्षी पेंग शुआईनेही उपांत्य फेरी गाठली होती. झेंगची उपांत्यपूर्व लढत द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्काशी होईल. साबालेन्काने रशियाच्या दारिया कॅसात्किनाचा 6-1, 6-3 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीसह अग्रस्थानावरही झेप घेतली आहे.