14 वर्षाखालील राष्ट्रीय उपकनिष्ठ मुलींची फुटबॉल स्पर्धा : भरिगा, कोमल व अन्वेशा यांची हॅट्ट्रीक
बेळगाव : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मान्यताप्राप्त कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य को. ऑप. सोसायटी पुरस्कृत राष्ट्रीय 14 वर्षाखालील मुलींच्या उपकनिष्ठ फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून मध्यप्रदेशने जम्मू-काश्मीरचा तर उत्तरप्रदेशने केरळचा 1-0 असा निसटता पराभव करत प्रत्येकी 3 गुण मिळविले. भरिगा तिवारी, कोमल व अन्वेशा हलदार यांनी हॅट्ट्रीकसह प्रत्येकी 4 गोल नोंदविले.
माळमारुती येथील लव्हडेल स्कूल येथे स्पोर्टींग प्लॅनेट अॅस्ट्रो टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात उत्तरप्रदेशने केरळचा कडव्या लढतीत 1-0 असा निसटता पराभव केला. 8 व्या मिनिटाला उत्तरप्रदेशच्या कोमलच्या पासवर सलोनीने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. दुसऱ्या सामन्यात मध्यप्रदेशने जम्मू-काश्मीरचा 14-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात 10 व 21 व्या मिनिटाला कोमलने 2 गोल केले. 12 व्या मिनिटाला प्रणाली वर्माने गोल केला. 17 व्या मिनिटाला सुनिधी जग्गन्नावरने गोल केला. 29 व्या मिनिटाला भरिगा तिवारीने गोल केला. पहिल्या सत्रात मध्यप्रदेशने 5-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 36, 55, 70 व्या मिनिटाला अनिशा हालदारने 3 गोल केले. 54 व 63 व्या मिनिटाला कोमलने 2 गोल केले. 38, 53 व जादा वेळत (73 व्या मिनिटाला) 3 गोल केले. 65 व्या मिनिटाला कर्णधार तृशा परमारने गोल केला.
रविवारचे सामने : 1) राजस्थान वि. ओडिसा सकाळी 8.30 वा. 2) चंदीगड वि. तेलंगणा दुपारी 3 वा.









