महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार सुडबुध्दीने वागतंय-नाना पटोले
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावरून महाराष्ट्रात भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. मविआच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात आरक्षण मिळाले नाही अशी टीका करत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीवर नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. माझा राजीनामा मागणं म्हणजे भाजपचा बालिशपणा असल्याचे म्हटले आहे.
यावेळी पटोले म्हणाले, महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार सुडबुध्दीने वागतंय असा आरोप त्यांनी केला आहे. आज जो सुप्रिम कोर्टाचा निर्णय दिला आहे तो चार दिवसात कसा काय बदलला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या कोणत्याही मताशी सहमत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. भाजप सत्तेसाठी हापापली आहे असेही ते म्हणाले.
भाजपवर निशाणा साधताना पटोले म्हणाले, भाजपाने हुरळून जाऊ नये. मध्यप्रदेशाचा सुप्रिम कोर्टाचा चार दिवसापूर्वीचा निकाल लागला त्याआधी दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचा निकाल लागला यात काही तफावत नव्हती. मात्र चार-पाच दिवसात असा काय चमत्कार घडला आणि सुप्रिम कोर्टाने निर्णय कसा बदलला याचे आश्चर्य वाटतंय. हा परीक्षणाचा भाग आहे. सुप्रिम कोर्टाचा निकाल तपासून न बोलता भाजप आरोप- प्रत्यारोप करत आहे हे चुकीच असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
संविधानिक व्यवस्थेप्रमाणे सत्तेपेक्षा मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे महत्त्व आम्हाला जास्त आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा निर्णय तपासून यावर प्रतिक्रिया देणार असल्याचे पटोले म्हणाले.