वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेश या राज्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे, असे पाहणीत आढळले आहे. 2018 मध्ये या राज्यात वन्य वाघांची एकंदर संख्या 526 होती. ती 2022 मध्ये 785 पर्यंत वाढल्याचे या संदर्भातील अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वाघ आणि तत्सम शिकारी प्राणी आणि त्यांची भक्ष्ये यांची स्थिती-2023 असे या अहवालाचे नाव आहे. मध्यप्रदेश राज्याने वाघांची संख्या सर्वाधिक राखण्याचे कार्य गेली अनेक वर्षे केले आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे अभिनंदन केले.
मध्यप्रदेशच्या खालोखाल कर्नाटकात 563 वाघ नोंद करण्यात आले आहेत. उत्तराखंडमध्ये 560 वाघ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. मध्यप्रदेश केवळ वाघांच्या संख्येतच पुढे आहे असे नव्हे, तर वाघांची संख्या वाढ करण्यामध्येही भारतात अव्वल स्थानी आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशात 2006 मध्ये केवळ 300 वाघ आढळून आले होते. त्यानंतर 2010 मध्ये त्यांची संख्या आणखी घटून ती 257 वर आली होती. त्यावेळी राज्याने व्याघ्रसंख्येतील आपला प्रथम क्रमांक गमावला होता. नंतर वाघांना वाचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यात गेल्या 14 वर्षांमध्ये व्याघ्रसंख्या जवळपास तिप्पट वाढली आहे.









