23 वर्षांनंतर प्रथमच मध्यप्रदेशला जेतेपदाची संधी, कार्तिकेयचे 128 धावात 8 बळी
वृत्तसंस्था/ अलूर
कुमार कार्तिकेय आणि हिमांशू मंत्री यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर शनिवारी येथे मध्य प्रदेश संघाने 23 वर्षांनंतर प्रथमच रणजी क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना बंगालचा 174 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात फिरकी गोलंदाजी कार्तिकेयने 128 धावांत 8 गडी बाद केले तर हिमांशू मंत्रीने फलंदाजीत पहिल्या डावात 165 तर दुसऱया डावात 21 धावा जमविल्या. आता मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 341 धावा जमविल्यानंतर बंगालने पहिल्या डावात 273 धावा जमविल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 68 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर मध्य प्रदेशने दुसऱया डावात 281 धावा जमवित संघाला निर्णायक विजयासाठी 350 धावांचे कठीण आव्हान दिले. मध्य प्रदेश संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयनने 67 धावांत 5 गडी तसेच गौरव यादवने 3 तसेच जैनने 2 गडी बाद केल्याने बंगालचा दुसरा डाव 65.2 षटकांत 175 धावांत आटोपला.
बंगालच्या दुसऱया डावात कर्णधार ईश्वरनने 7 चौकारांसह 78 धावा जमवित एकाकी लढत दिली. हिमांशू मंत्रीला सामनावीर घोषित करण्यात आले. मध्य प्रदेश संघाने यापूर्वी म्हणजे 1998-99 रणजी हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. मुंबई संघाने या स्पर्धेत आतापर्यंत 47 वेळा अंतिम फेरी गाठली असून त्यांनी 41 वेळा रणजी करंडकावर आपले नाव यापूर्वी कोरले. मुंबईने 2016-17 नंतर प्रथमच रणजी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश प. डाव 341, बंगाल प. डाव 273, मध्य प्रदेश दु. डाव सर्वबाद 281 (रजत पाटीदार 79, श्रीवास्तव 82, शाहबाज अहमद 5-79), बंगाल दु. डाव 65 षटकांत सर्वबाद 175 (ईश्वरन 78, शाहबाज अहमद नाबाद 22, आकाश दीप 20, कुमार कार्तिकेय 5-67, गौरव यादव 3-19, एस. जैन 2-69).









