समलैंगिक महिलेची भूमिका साकारणार
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आगामी चित्रपट जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे नाव ‘माजा मां’ असून या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी हे करणार आहेत. माधुरी या चित्रपटात ‘बधाई हो’ फेम गजराज राव यांच्यासोबत दिसून येणार आहे. चित्रपट कॉमेडी आणि कौटुंबिक नाटय़ दर्शविणारा असेल. माधुरी चित्रपटात गजराज राव यांच्या पत्नीची आणि एका आईची भूमिका साकारत आहे. तसेच ती एका समलैंगिक महिलेची भूमिका साकारत असल्याचेही चर्चा आहे.

वडोदरा शहराची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभलेली आहे. यात माधुरी अन् गजराव राव यांच्यासह ऋत्विक भौमिक, बरखा सिंह, सृष्टी श्रीवास्तव, मल्हार ठाकर, शीबा चड्ढा, रजित कपूर आणि सिमोन सिंह हे कलाकार देखील यात काम करत आहेत.
माधुरी दीक्षित यापूर्वी नेटफ्लिक्सच्या ‘द फेम गेम’ या सीरिजमध्ये दिसून आली होती. यात तिने एका लोकप्रिय अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. अलिकडेच तिने स्वतःचा दुसरा म्युझिक व्हिडिओ ‘तू है मेरा भी’ लाँच केला आहे. तिच्या 55 व्या जन्मदिनी तिच्या सर्व चाहत्यांसाठी ही एक प्रकारे भेट होती. या म्युझिक व्हिडिओला मोठी पसंती मिळाली आहे.









