हिंडनबर्ग अहवालाद्वारे करण्यात आले होते आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकपालने सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून क्लीनचिट दिली आहे. माधवी बुच यांच्यावरील आरोप निराधार आहेत. करण्यात आलेल्या तक्रारी कुठलाही गुन्हा किंवा तपासाचा आधार स्थापित करत नसल्याचे लोकपालने म्हटले आहे.
हिंडनबर्गने सेबीच्या माजी प्रमुखांवर अनेक गंभीर आरोप केले होते. यात माधवी बुच आणि अदानी समुहादरम्यान कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आला होता. आता लोकपालने स्वत:च्या चौकशी अहवालात क्लीनचिट दिली ओ. माधवी बुच यांना मार्च 2022 मध्ये सेबी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर आता त्या या पदावरून निवृत्त झाल्या असून त्यांच्याजागी तुहिन कांत पांडे यांना सेबी प्रमुख करण्यात आले आहे.
सेबी प्रमुख म्हणून माधवी बुच यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहिला. यादरम्यान त्यांनी आयपीओपासून स्टॉक आणि एफअँडओसाठी अनेक नियम लागू केले होते. याचदरम्यान अदानी समुहासंबंधी अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गचा अहवाल प्रकाशित झाला होता. तसेच हिंडनबर्गने माधवी बुच यांच्यासंबंधी एक अहवाल प्रकाशित केला होता. यात माधवी बुच यांच्यावर भ्रष्टाचार आणि अदानी समुहाशी कनेक्शनचे आरोप झाले होते.









