तांत्रिक विभागाची तारांबळ, अभियंत्यांना सोनसड्यावरील तसेच फिल्डवरील कामे, मुख्याधिकाऱ्यांकडून आदेश जारी
प्रतिनिधी / मडगाव
उच्च न्यायालयाने सोनसडा कचरा प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर आळशी संबोधत ताशेरे ओढल्याने मडगाव पालिकेच्या तांत्रिक विभागाची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. सर्व कनिष्ठ अभियंत्यांसह साहाय्यक अभियंत्यांना सोनसड्यावरील तसेच फिल्डवरील कामे सोपविण्यात आली असून कोणी पालिकेत बसून राहू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत.
पालिकेचे कनिष्ठ अभियंता सज्जन गावकर, राजेश देसाई, विराज बोळणेकर आणि नितीन कोठारकर यांना पालिकेच्या प्रभागांतील कचरा ओला व सुका असे वर्गीकरण करून ट्रकांमध्ये गोळा होईल याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कचरा उचल केंद्रांवर उपस्थित राहून वरील देखरेख ठेवावी, असे फर्मान मुख्याधिकाऱ्यांनी सोडले आहे. ऑटोमोबाईल अभियंता रोहित गावकर यांच्यावर ट्रक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. या ट्रकांमधून कचऱ्याचे सांडपाणी (लिचेट) बाहेर सांडणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
साहाय्यक अभियंता विशांत नाईक यांच्यासह कनिष्ठ अभियंता अजय देसाई, सागर नाईक यांची सोनसड्यावर रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्यावर सोनसडा येथील स्थितीवर लक्ष केंद्रीत करून आवश्यक उपाययोजना व विकासकामे मार्गी लावण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गुऊवारी यासंदर्भातील आदेश जारी झाल्यानंतर पालिकेतील चार टेबले आणि खुर्च्या सोनसड्यावर पाठविण्यात आल्या. पालिकेचे सॅनिटरी निरीक्षक विराज आरबेकर आणि संजय सांगेलकर यांच्यावर न्यू मार्केट आणि गांधी मार्केट तसेच एसजीपीडीए मार्केटमधील प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मिश्र कचऱ्यासंदर्भात धरले धारेवर
दरम्यान, एसजीपीडीए मार्केटमधील बायोमिथेनेशन प्रकल्पासाठी पालिकेकडून वर्गीकरण केलेला ओला कचरा पुरविण्यात येत असतो. बुधवारी सायंकाळी कचरा मिश्र स्वऊपाचा असल्याने घेण्यास प्रकल्प चालकांनी नकार दिला. गुरुवारी सकाळी हे प्रकरण मुख्याधिकाऱ्यांकडे पोहोचले असता त्यांनी संबंधित अभियंता तसेच पर्यवेक्षकांना चांगलेच धारेवर धरले. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबी यावेळी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सोनसड्यावर आमदार कामत यांचा पाय पडला नाल्यात
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचा एक पाय गुऊवारी सोनसड्यावरील खुल्या नाल्यात पडला, मात्र ते कोणत्याही इजेविना सुखरूप बचावले. मडगाव नगरपालिकेला उच्च न्यायालयाने सोनसड्यावरील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व अधिकाऱ्यांसमवेत कामत यांनी गुरुवारी सकाळी सोनसड्याला भेट दिली तेव्हा कामत यांचा पाय गुडघाभर पाण्याच्या उघड्या नाल्यात पडला, अशी माहिती सूत्रांनी दिली.









