उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी, मागील अडीच वर्षांहून जास्त कालावधीपासून स्थळाला टाळे
सांगे : सांगे मतदारसंघातील वालकिणी वसाहत क्रमांक 1 जवळील सुमारे दोन वर्षे आठ महिन्यांपासून बंद असलेले माडेल हे पर्यटनस्थळ लवकरच खुले करण्यात येणार असून तसा आदेश सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी जारी केल्याची माहिती मिळाली आहे. या स्थळाच्या मुख्य फाटकाला कोविड काळात सप्टेंबर, 2020 मध्ये जे टाळे लावले होते ते अद्यापही तसेच आहे. आता हे टाळे काढण्यात येणार असून या पावसाळ्यात पर्यटकांना साळावली धरणाचा जलाशय पाहण्याचा आनंद लुटण्यास मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत. मध्यंतरी हे ठिकाण खुले करण्याची मागणी सांगेतील नागरिकांनी केली होती. कोविड काळात साळावली धरण, सावरी धबधबा, बोटॅनिकल गार्डन, मैनापी धबधबा या पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या ठिकाणी जाण्यास प्रवेशबंदी होती. कोविड आटोक्यात आल्यानंतर ती खुली करण्यात आली. मात्र माडेल येथील पर्यटनस्थळ बंदच राहिले. साळावली धरणाच्या जलाशय परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकासाच्या या प्रकल्पाचे काम 2014 साली हाती घेऊन केवळ पहिल्या टप्याचे काम पूर्ण झालेले आहे. आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रयत्नांतून पुढे आलेल्या या प्रकल्पाकडे माजी आमदार प्रसाद गावकर यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. आत्ता फळदेसाई हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्नरत आहेत. 7 नोव्हेंबर, 2014 रोजी तत्कालीन जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते या योजनेची पायाभरणी करण्यात आली होती. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम एकूण तीन टप्प्यांत पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले होते. पण नंतरच्या काळात माजी आमदार प्रसाद गावकर यांनी लक्ष न दिल्याने प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरूच झाले नाही. आता ही जबाबदारी मंत्री फळदेसाई यांच्यावर येऊन पडली आहे. सध्या येथे दिवसा दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून पर्यटकांना पूर्णपणे बंदी आहे. आता लवकरच कुलूप काढून स्थळ खुले करण्यात येणार आहे. सध्या या स्थळापासून उत्पन्न काही नाही, मात्र सुरक्षा रक्षकांच्या पगारावर वर्षाकाठी लाखो ऊपये जलस्रोत खाते खर्च करते, अशी माहिती मिळाली आहे.
वाढत्या तक्रारींनंतर ठोकले होते टाळे
कोविड काळात येथे मोठ्या प्रमाणात युवक-युवती मौजमजा करण्यासाठी येत असत, पार्ट्या होत असत. सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकलेल्या पाहायला मिळत. त्यातच अमलीपदार्थांचा येथे वापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. वाढत्या तक्रारींनंतर तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी जलस्रोत खात्याचा अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या पर्यटनस्थळाच्या मुख्य फाटकाला टाळे ठोकले होते. हे पर्यटनस्थळ जलस्रोत खात्याने निर्माण केले आहे, मात्र तेथे जाण्यासाठीचा रस्ता वन विभागाच्या अखत्यारित येतो. या दोन्ही खात्यांनी येथील पुढील विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी हे ठिकाण वनविकास महामंडळाकडे सुपूर्द करून त्याचा विकास करण्याची मागणी लोकांकडून होत होती. एका बाजूने जंगल, दुसऱ्या बाजूने जलाशय व मध्ये जलस्रोत खात्याने कोट्यावधी ऊपये खर्चून कृत्रिम बेट तयार केले आहे. अर्धवट काम करून खात्याने हा परिसर सोडून दिला. येथील सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिवाबत्त्या निकामी झाल्या आहेत. आतील भागात सर्वत्र झाडेझुडपे वाढलेली आहेत. सध्या सुरक्षा रक्षक असल्याने अनैतिक प्रकारांना आळा बसलेला आहे. पावसाळ्यात धरणाचा जलाशय तुडुंब भरल्यानंतर हा परिसर पर्यटकांना मोहित करून सोडतो. येथे सुशोभिकरणास खूप वाव असून बोटिंग सुरू करण्यावर विचार होऊ शकतो तसेच बऱ्यापैकी उद्यान तयार करता येते. शिवाय ‘रोपवे’ उभारता येतो. तसे केल्यास साहसी पर्यटनाला चालना मिळू शकते.









