अमित शाह यांच्यासमोर नितीश कुमारांकडून भूमिकेचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये चालू वर्षात विधानसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते बिहारच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. रविवारी पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लोकार्पण अन् शुभारंभ कार्यक्रमात शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात बोलताना दोनवेळा चूक झाली, आता इकडे तिकडे जाणार नसल्याचे म्हणत नितीश कुमारांनी राजदसोबत पुन्हा आघाडी करणार नसल्याची भूमिका मांडली आहे.
बिहारमध्ये पूर्वी गुंडाराज होते, परंतु आमच्या सरकारने हे गुंडाराज संपुष्टात आणले आणि आता रात्री उशिरा देखील लोक भीतीशिवाय रस्त्यांवर फिरत आहेत. कोसी समवेत अनेक प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, बिहारमध्ये आता उत्तमप्रकारे काम होत असलयाचा दावा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे.
व्यवस्था दुरुस्त करतोय
आम्ही 24 नोव्हेंबर 2005 रोजी बिहारमध्ये सत्तेवर आलो, परंतु त्यावेळी राज्याची स्थिती काय होती हे सर्वांनाच माहित आहे, संध्याकाळी कुणीच घरातून बाहेर पडत नव्हते. पूर्वीच्या सरकारांनी राज्यात कामच केले नव्हते. केवळ आणि केवळ हिंदू-मुस्लिमांच्या नावाखाली लोकांना लढविले जात होते. राज्यात शिक्षणाच्या नावावर काहीच नव्हते. याचबरोबर लोकांच्या उपचाराची देखील व्यवस्था नव्हती. परंतु आम्ही सत्तेवर आल्यापासून पूर्ण व्यवस्था सुधारत आहोत. मधल्या काळात आमच्याकडुन दोनवेळा चूक झाली, पक्षाच्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार मी रालोआतून बाहेर पडलो होतो, परंतु आता ही चूक पुन्हा करणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनीच मला मुख्यमंत्री केले होते, वाजपेयींनीच माझ्यावर भरवसा दाखविला होता असे म्हणत नितीश यांनी लालूप्रसाद यादवांच्या राजदला लक्ष्य केले आहे.
लालूप्रसाद यादव लक्ष्य
लूलूप्रसाद यादवांकडून मी बिहारमध्ये त्यांनी केलेले कामांचा हिशेब मागत आहे. लालूप्रसादांनी राज्यात काही कामं केली असतील तर ती सांगावीत. लालूप्रसाद आणि राबडीदेवींच्या शासनकाळात बिहारमध्ये जंगलराज होते. 2025 मध्ये पुन्हा रालोआच विजयी होणार असून मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये पुन्हा रालोआचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा अमित शाह यांनी केला आहे.









