म्हसवड :
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील आप्पासो बाबासो भोसले यांनी पोलीस ठाण्याच्या 112 या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर तब्बल 22 वेळा फोन करून आईने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली. या प्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार 10 रोजी पावणे नऊ ते पावणे बारा यावेळेत माण तालुक्यातील कुकुडवाडच्या शिवाजीनगर येथील आप्पासो बाबासो भोसले यांनी, मला माझ्या आईने मारहाण केली आहे व चाकूने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करून ती पळून गेली आहे, असा खोटा फोन 112 या आपत्कालीन क्रमांकावर केला. पोलिसांनी शहनिशा केली असता कोणतीही मारहाण झालेली नसताना भोसले यांनी पोलिसांना जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन आपत्कालीन संपर्क यंत्रणेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आप्पासो काटकर विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.








