तीन दिवसात उत्तर देण्याचे निर्देश
► वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणावरून वादग्रस्त विधान केल्याने तृणमूल काँग्रेस नेते मदन मित्रा यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य पक्षाच्या कठोर भूमिकेविरुद्ध असल्याने येत्या तीन दिवसात योग्य खुलासा करण्यात यावा, असे पक्षाने म्हटले आहे. ‘28 जून 2025 रोजी तुम्ही (मदन मित्रा) बलात्काराच्या घटनेसंबंधी केलेले अनुचित, अनावश्यक आणि असंवेदनशील विधान पक्षाच्या प्रतिमेला गंभीरपणे हानी पोहोचवत आहे. तसेच, तुमचे वक्तव्य पक्षाच्या कडक भूमिकेविरुद्ध आहे. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या या वर्तनाबद्दल पुढील तीन दिवसात कारणे स्पष्ट करावीत.’ असे निर्देश पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष सुब्रत बक्षी यांनी दिले आहेत.
कोलकाता शहरात एका कायद्याच्या विद्यार्थिनीसोबत गेल्या आठवड्यात एक अतिशय घृणास्पद आणि अत्यंत दु:खद घटना घडली होती. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने या अत्यंत संवेदनशील दु:खद आणि क्रूर छळाच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. प्रशासन आवश्यक ती कारवाई करत असून दोषींना अटक करण्यात आली आहे, असेही सुब्रत बक्षी यांनी म्हटले आहे.









