खंडाळा लिलावात निघण्याचे पाप त्यांचेच; कारखाना उभारणीतच भ्रष्टाचार; मदन भोसलेंच्या कुटुंबियांसह पैपाहुण्यांनी कारखाना लुटला; जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा आरोप
सातारा प्रतिनिधी
” खंडाळा कारखाना हा अडीच हजार मेट्रीक टन क्षमतेचा असून तो उभारण्यासाठी 110 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. परंतु त्या कारखान्याच्या उभारणीला सुमारे 182 कोटी रुपये लागले आहेत. 60 ते 65 कोटींचा गफला या मदन भोसले यांनीच केला आहे. त्यांनी नुसते नरडीला नख नाही लावले तर नरडेच खाल्ले आहे. जन्माला घालतानाच कुपोषित घातले” असा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केला. दरम्यान, खंडाळा लिलावात निघण्याचे पाप मदन भोसले यांचेच असून आम्ही तसे होवू देणार नाही. खंडाळा 1 ऑक्टोबरला तर किसन वीर 10 ऑक्टोबरपर्यत सुरु होईल, असा दावा त्यांनी केला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक बाबासाहेब कदम, हणंमत चव्हरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन पाटील म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी किसन वीरचे माजी चेअरमन मदन भोसले यांनी खंडाळा कारखाना संदर्भात आमदार मकरंद पाटील आणि माझ्यावर आरोप केले होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की खंडाळा कारखान्याची निवडणूक 17 ऑक्टोबर 2021 ला झाली तर किसन वीर कारखान्याची निवडणूक त्यानंतर होवून चेअरमन निवड 17 मे ला झाली. आमचा कारभार सुरु झाला. दोन्ही कारखान्यांची नेमकी परिस्थिती काय हे समजले पाहिजे. दोन्ही कारखान्यावर प्रंचड कर्ज आहे. पाचही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही निवडणूक लढवली. खंडाळा कारखान्यावर बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, विदर्भ कोकण बँक या बँकोचे 90 कोटींचे कर्ज आहे. किसनवीरचे भाग भांडवल 36 कोटी 37 लाख आहे. अशी कारखाना उभारणीत 182 कोटीची गुंतवणूक झाली आहे. अडीच हजार मेट्रीक टन क्षमतेचा कारखाना उभा करायला 80 कोटी लागतात. शेतकऱ्यांनी त्यासाठी 5 हजार एकरपासून जमिनी कमी भावाने दिलेल्या आहेत. 148 एकर जमीन आहे. 110 कोटी खर्च झाले असून 60 ते 65 कोटी जास्त खर्च झाले असून कारखाना उभारणीतच भ्रष्टाचार झाला आहे.” असा आरोप केला.
तुम्ही नरडीला नख नाही लावलं तर अख्ख नरडं खाल्ल
मदन भोसले तुम्ही आम्हाला म्हणालात खंडाळा कारखान्याच्या नरडीला नखं लावलं. पण तुम्ही तर नखं नाही लावलं तर अख्ख नरडंच खाल्ल आहे. कारखाना जन्माला घालतानाच तुम्ही कुपोषित घातलात. आर्थिक अडचणीत कारखाना त्यामुळे आणला आहे. शरयू कारखाना उभा करण्यास सहा महिने लागले. खंडाळा कारखाना उभा करण्यामध्ये चार वर्ष लागली. त्यामुळे व्याजाचा बोजा कारखान्यावर पडला. एकूण कर्जाचा आकडा हा अडीचशे कोटी एवढा आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, चार वर्ष गाळप झाले तेही पूर्ण क्षमतेने नाही. पुन्हा बंद पडल्याचेही त्यांनी सांगितले.
मदन भोसले यांच्याच कार्यकाळात जप्तीच्या नोटीसा
बँकेची देणी आहेतच. त्यांच्या नोटीसा आठ वेळा आलेल्या असून त्या आता आलेल्या नाहीत. मदन भोसले यांच्या कार्यकाळात आलेल्या आहेत. दि. 8 जानेवारी 2020 ला पहिली नोटीस आली. त्यानंतर 8फेब्रुवारी 2021 ला दुसरी आली तर तिसरी दि.30 मार्च 2021 ताबा नोटीस आली. चौथी दि. 9एप्रिल 2021 पेपरला पुन्हा नोटीस आली. त्याच वेळी पेपरला बातम्या आल्या होत्या. त्यावेळी कोरोना काळात बॅंकांना वसुली करता येत नव्हती. नाहीतर त्याचवेळी कारखान्याचा लिलाव झाला आहे. हे सगळे पाप मदन भोसले यांचेच आहे. त्यांनीच केलेला उद्योग आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून एक रुपयाचे कर्ज घेतले नाही. तरीही या माणसाकडे किती कोडगेपणा असावा, निर्जलीपणे मीडियापुढ सांगत असाल तर खुप काळजी वाटते, असा खेद नितीन पाटील यांनी व्यक्त केला.
मदन भोसले यांच्या कारनाम्याचे पुस्तक होईल
तिन्ही कारखान्यावर नऊ ते दहा बँकांची 575 कोटींची कर्ज आहेत. 60 कोटी केन पेमेंट द्यायच आहे, आमच्या ताब्यात कारखाने आले तेव्हा ना कॅश होती, ना बॅगस होती, ना साखर होती. खडखडीत मोकळा ताब्यात घेतला. जीएसटीचे पैसे सुद्धा थकवले आहेत त्यांनी. कामगारांचा 6 कोटी पीएफ भरला नाही. सगळा इतिहास मांडायचे झाले तर मदन भोसले के कारनामे असे दोनशे पानांचे पुस्तक तयार होईल, असे सांगत त्यांनी व्यापाऱयांकडून घेतलेले 60 कोटीही दिले नाहीत. त्यांची फसवणूक केली आहे, असाही आरोप त्यांनी केला.
पाहुण्या रावण्यांनीही लुटला कारखाना
मदन भोसले यांच्या घरादाराने कारखाना मोडून खाल्ला. पण त्यांच्या पाहुण्या रावळ्यांनीही लुटून खाल्ला. मदन भोसले यांचे धाकटे बंधू गजानन भोसले यांच्या पत्नी अनुराधा भोसले यांनी 49 लाख लाखाची उचल घेतली. तर मेहुणे चिकणे यांनी 19 लाखाची उचल घेतली. त्यांच्या पावण्यारावळ्य़ांनीही कारखाना धुतला, असा ही आरोप नितीन पाटील यांनी केला.
खंडाळा कारखाना 1 ऑक्टोबरला सुरु करणारच
आम्ही खंडाळा कारखान्याचा लिलाव होवू देणार नाही. कारखाना पूर्ववत सुरु करणार आहोत. आजच्या तारखेला सभासद शेतकऱयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 24 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. साडेतीनशे टोळय़ांना ऊसाचा पहिला हप्ता दिला. अडीचशे बैलगाडय़ांना पहिला हप्ता दिला आहे. तोडणी वाहतूकदारांना पैसे दिले आहेत. सगळी यंत्रणा तयार आहे. दुसरा हप्ता सप्टेंबर अखेर दिला जाईल. दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालवणार ओह. 14 हजार मेट्रीक टन ऊसाची नोंद झाली आहे. 1 ऑक्टोबरला खंडाळा सुरू करणार आहोत तर 10 ऑक्टोबरपर्यंत किसन वीरचे गाळप सुरु होईल. दि. 7 ऑक्टोबरला रामराजेंच्या हस्ते मोळी टाकून गाळपाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.
मदन भोसले हे आडकाठी आणत आहेत
कारखाना पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यात मदन भोसले यांच्याकडून आडकाठी सुरु झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाबार्डचे अध्यक्ष चिंताला यांना पत्र दिले आहे. सक्तीने जबरदस्तीने वसुली केली जात आहे. ते पत्र आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना उत्तर पाठवले. तुम्ही तुमची समिती नेमा आणि ती पाठवा चौकशीला. सभासदांच्या मुलाखती घ्या. शेतकरी काय सांगतील ते कळेल, असेही त्यांनी सांगितले.
कारखान्यासाठी आमचे राजकीय अस्तित्व पणाला लावले
पाच तालुक्यातील शेतकऱयांच्या हितासाठी हा कारखाना वाचला पाहिजे. याकरता आम्ही आमचे राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे. आम्ही हे सत्तेसाठी करत नाही. तर शेतकरी, ऊस उत्पादक सभासद यांच्या न्याय हक्कासाठी करतो आहे, असेही नितीन पाटील यांनी सांगितले.
एकाने कारखाना आणि दुसऱ्याने बँक बुडावली
पत्रकार परिषदेला अगोदरच उशीर झाला होता. तरीही त्यात कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्यासाठी नितीन पाटील यांनी पाच मिनिटे थांबा आमचे व्हाईस चेअरमन येत आहेत, असे सांगताच पत्रकारांनी मदन भोसले यांच्याही पत्रकार परिषदेला असाच सीव्ही काळेंच्यामुळे उशीर केला होता. त्यावर नितीन पाटील म्हणाले, एकाने बँक बुडवली तर दुसऱयांने कारखाना. दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.