क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
फातर्पात श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण सभागृहात सुरू असलेल्या पश्चिम विभागातील दृष्टीहिनांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील सातव्या फेरीनंतर महाराष्ट्राचा मदन बागायतकर 6.5 गुणानी पहिल्या स्थानावर आहे. युनिक चेस अकादमीने अखिल भारतीय अंधांच्या बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या जेतेपदासाठी जबरदस्त चुरस असून आज रविवारी या स्पर्धेतील शेवटची फेरी खेळविण्यात येईल.
सातव्या फेरीनंतर महाराष्ट्राचे अतुल काकडे व शिरीष पाटील हे प्रत्येकी 6 गुणांनी संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. बक्षीस वितरण समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी केपेचे आमदार एल्टोन डिकॉस्ता, मडगावच्या उपनगराध्यक्षा दिपाली सावळ यावेळी खास आमंत्रित म्हणून उपस्थित असतील. स्पर्धेत प्रथम 15 बुद्धिबळपटूंना रोख बक्षिसे देण्यात येतील.









