वाई :
चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन गुऱ्हेबाजार झोपडपट्टीत दोन गटात हाणामारीची घटना दि. 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता झाली. कोयता अन् दांडक्याचा या मारहाणीत वापर केल्याने एका गटातील तीन जण जखमी झाले असून दुसऱ्या गटातील सहा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारामारीच्या घटनेची वाई परिसरात जोरदार चर्चा सुरु होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात आकाश तुकाराम जाधव (वय 23, रा. गुरेबाजार झोपडपट्टी) याने दि. 13 जुलै रोजी रात्री 12.41 वाजता दिलेल्या तक्रारीनुसार माझा चुलत भाऊ अक्षय कांताराम जाधव, सनी सुभाष जाधव यांची आमच्या घराजवळ राहणारा मनोज अमर जाधव याच्यासोबत एकमेकांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन चारपाच दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यावरुन दि. 12 जुलै रोजी रात्री 8 वाजता मी व अक्षय व माझा भाचा संदीप सतीश वाघे, समीर मुकणे असे आम्ही माझ्या घराजवळ बोलत उभे राहिलो होतो. त्यावेळी अक्षयचा छोटा भाऊ रोहित याचा फोन आला की शुभम बाजीराव जाधव, अजय मच्छिंद्र धोत्रे, मनोज अमर जाधव, विजय मच्छिंद्र धोत्रे, प्रेमजीत संतोष पवार, विकास जाधव हे त्यांच्या हातात कोयते व लाकडी दांडके घेवून मला मारायला आले आहेत. त्यामुळे आम्ही लागलीच रोहित याच्याकडे जायला निघालो. त्यावेळी आमच्या वस्तीच्या जवळच मारुती मंदिरालगत शुभम बाजीराव जाधव, अजय मच्छिंद्र धोत्रे, मनोज जाधव, विजय धोत्रे, प्रेमजीत पवार, विकास जाधव सर्व रा. गुऱ्हेबाजार झोपडपट्टी हे आले. त्यावेळी अक्षय जाधव याने त्यांना रोहितला मारण्यासाठी तुम्ही कशाला त्याच्या दुकानात गेला. असे विचारल्यावर तू कोण सांगणारा, तुला व तुझ्या भावाला लय मस्ती आलीया तुला जीवंत सोडत नाही असे म्हणत शिवीगाळ करत अजय धोत्रे याने कोयत्याने अक्षय जाधव याच्या डोक्यात वार करुन जखमी केले.
तसेच शुभमने देखील कोयत्याने अक्षय जाधव याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अक्षयने हुकवला. त्यामुळे अक्षयच्या डाव्या भुवईवर जखम झाली. तसेच मनोजने लाकडी दांडक्याने अक्षय आणि समीरच्या पाठीवर आणि हातावर मारहाण केली. विजय धोत्रे याने मला दांडक्याने जोरात मारले. त्यावेळी प्रेमजीत पवार हा मोठमोठ्याने जोरात ओरडून यांना आज जीवंत सोडायचे नाही, मारुन टाकतो, असे म्हणत होता, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








