प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील वनसंपदेत दिवसेंदिवस घट होत असताना आता कॅन्टोन्मेंट बोर्डनेही झाडे तोडण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीतील 31 झाडे तोडण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. जुनाट व धोकादायक झाडे तोडली जाणार असल्याचे कॅन्टोन्मेंटने म्हटले असले तरी यामुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शहरात सर्वाधिक झाडांची संख्या ही कॅन्टोन्मेंट हद्दीत आहे. हा परिसर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्यामुळे वृक्षतोड करताना परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे शहराच्या इतर भागापेक्षा अधिक झाडे कॅन्टोन्मेंट परिसरात आहेत. काही झाडे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने ती काढण्याचा विचार कॅन्टोन्मेंटचा सुरू आहे. त्यामुळे झाडे हटविण्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
इच्छूक कंत्राटदारांनी 5 मे पूर्वी निविदा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु यामुळे शहरातील 31 झाडांची संख्या कमी होणार आहे. खासगी जागेतील झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असताना आता सरकारी जागेतील झाडेदेखील हटविण्यात येत आहेत. एकीकडे धोकादायक झाडांमुळे ती हटविण्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.









