वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनला पुऊष टेबल टेनिस सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवून देताना मा लाँग ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारा चिनी खेळाडू बनला आहे. चीनने सांघिक स्पर्धेत सलग पाचवा ऑलिम्पिक विजय नोंदविताना स्वीडनचा पराभव केला आणि लाँगने सर्वाधिक यशस्वी टेबल टेनिस ऑलिम्पिकपटू बनताना सहावे सुवर्ण मिळवले.
35 वर्षीय मा याने 2012 मधील लंडन ऑलिम्पिकपासून प्रत्येक उन्हाळी खेळांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. ‘गेली 12 वर्षे हा चढ-उतारांनी भरलेला प्रवास आहे आणि मी स्वत:ला भाग्यवान समजतो. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये मी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. टोकियोनंतर मी पॅरिसमध्ये येण्याची अपेक्षा केली नव्हती, परंतु या तीन वर्षांनी मला मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या सुधारण्यास मदत केली. हे सुवर्णपदक माझ्या ऑलिम्पिक प्रवासाची सांगता करण्याचा उत्तम क्षण आहे’, असे त्याने सांगितले.
पॅरिस, टोकियो, रिओ दि जानेरो आणि लंडन ऑलिम्पिकमधील सांघिक स्पर्धांत चार सुवर्णपदके जिंकणारा मा हा एकमेव खेळाडू आहे. त्याने टोकियो आणि रिओमध्ये एकेरीतही सुवर्णपदक जिंकले. तो पॅरिसमध्ये एकेरीची स्पर्धा खेळला नाही. मी माझी ऑलिम्पिक कारकीर्द संपवत आहे, पण पूर्णपणे निवृत्त होत नाही. रसिक मला भविष्यात आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांत पाहू शकतील, असे त्याने सांगितले.
टेबल टेनिसमध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजविलेल्या चीनने पॅरिसमध्ये आतापर्यंत चार ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत. पुऊष आणि महिला एकेरीत आणि मिश्र दुहेरी स्पर्धेत त्यांनी इतर विजय नोंदविले आहेत. महिला सांघिक स्पर्धेतही त्यांनी अंतिम फेरी गाठलेली असून जपानशी लढत होणार आहे. 1988 मध्ये सेऊल येथे ऑलिम्पिक कार्यक्रमात या खेळाचा समावेश झाल्यापासून चीनने 41 पैकी 36 सुवर्णपदके जिंकली आहेत. जपानविऊद्धच्या सामन्यात विजय मिळवून पुऊषांच्या सांघिक प्रकारात फ्रान्सने कांस्यपदक जिंकले. सांघिक स्पर्धेत फ्रान्सला मिळालेले हे पहिले पदक आहे.









