आंबेवाडीत भव्य प्रचारफेरी : आर. एम. चौगुले यांनाच निवडून आणण्याचा निर्धार
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारासाठी रविवार दि. 7 रोजी भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी भाषा, संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीचे उमेदवार चौगुले यांनाच निवडून आणण्याचा निर्धार आंबेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. समिती उमेदवार आर. एम. चौगुले यांचे गावात आगमन होतात फटाक्यांची आतषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिला वर्गाने औक्षण करून स्वागत केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. आंबेवाडी गाव समितीचा बालेकिल्ला मानला जातो. आजतागायत सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढ्यात आंबेवाडीवासियांनी आपला सहभाग नोंदवत मराठी अस्मितेचे दर्शन घडविले आहे. त्यानुसार रविवारी काढलेल्या प्रचारफेरीतही ग्रामस्थांनी व महिलावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून चौगुले यांना आपला पाठिंबा जाहीर करत प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. प्रचारफेरीत सहभागी झालेल्या युवकांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गावातील प्रत्येक गल्लीतून प्रचार करीत घरोघरी जाऊन मतदारांना समितीला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांनीदेखील आम्ही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता समितीच्या पाठीशी ठाम राहत चौगुले यांना निवडून देण्याची ग्वाही दिली. प्रचारफेरीत गव्ह. कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतिवाडकर, एपीएमसी माजी सदस्य शिवाजी राक्षे, आंबेवाडी ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष अनंत तुडयेकर, तालुका पंचायत माजी सदस्य कमल मनोळकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, समिती पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









