प्रतिनिधी/ बेळगाव
1 नोव्हेंबर काळा दिवस, देख लेना आँखोसे, हम आएंगे लाखोंसे, आम्ही बेळगावकर, बेळगाव माझे, आता खूप झाले मराठ्यांनो वेळ काढा बाहेर पडा, ब्लॅक डे, असा उल्लेख करून तो मेसेज सोशल मीडियावर पाठविला म्हणून म. ए. समितीच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या खटल्याची सुनावणी येथील तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये शनिवारी होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
दत्ता मनोज यळ्ळूरकर, रा. गांधीनगर, मारुती पुंडलिक पाटील, रा. बेनकनहळ्ळी, केदारी रामा करडी, रा. मच्छे या तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर 2016 रोजी हा मेसेज पाठविण्यात आला होता. खडेबाजार पोलीस स्थानकाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांच्या मोबाईलवर हा मेसेज आला. चन्नम्मा सर्कल येथे ते सेवा बजावत असताना हा मेसेज आल्यानंतर त्यांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला.
1 नोव्हेंबर हा कर्नाटकचा राज्योत्सव आहे. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी 153(ए), सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी येथील तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. प्रताप यादव, अॅड. महेश बिर्जे हे काम पहात आहेत.









