शहर समितीच्या बैठकीत निर्धार : बेळगाव उत्तर, दक्षिण मतदारसंघात पोषक वातावरण
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती भाषिक न्याय हक्कासाठी लढा देत असून आपली लोकेच्छा व्यक्त करण्यासाठी निवडणुका लढवित असते. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये बेळगाव उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदारसंघात म. ए. समितीला पोषक वातावरण असून मोठ्या मताधिक्क्याने उमेदवार विजयी करण्याचा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या शहर म. ए. समितीच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले. व्यासपीठावर शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर येळ्ळूरकर, गजानन पाटील, अनिल आमरोळे उपस्थित होते. प्रारंभी सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी उमेदवारांचे अभिनंदन करत प्रचाराविषयी आवश्यक असणाऱ्या बाबी स्पष्ट केल्या. दीपक दळवी यांनी मागील विधानसभांच्या निवडणुकांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येळ्ळूर म. ए. समितीचे सरचिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी प्रचाराला येळ्ळूरमधील चांगळेश्वरीच्या आशीर्वादाने सुऊवात करावी, असे मत मांडले. रणजीत हावळण्णाचे म्हणाले, प्रत्येक विभागात एक घटक समिती असून त्या समितीला विचारात घेऊन प्रचाराची रणनिती ठरविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मदन बामणे, शिवराज पाटील, मोतेश बारदेशकर, सागर पाटील, एम. आर. पाटील, अनिल पाटील, शिवानी पाटील यासह इतरांनी मार्गदर्शन केले.
मंत्री महाजन व चित्रा वाघ यांचा निषेध
महाराष्ट्र एकीकरण समिती मागील 66 वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. परंतु महाराष्ट्रातीलच राष्ट्रीय पक्षांचे पदाधिकारी म. ए. समितीच्या उमेदवाराविरोधातील उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातून राष्ट्रीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी न येण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही मागील दोन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन व चित्रा वाघ या प्रचारात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहर म. ए. समितीच्या बैठकीत या दोघांचाही निषेध व्यक्त करून यापुढे काळे झेंडे दाखविले जातील, असे सांगण्यात आले.









