ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपचे दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या उपचारांसाठी लागणाऱ्यां औषधांची मी परदेशातून व्यवस्था केली होती, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका सभेत केले होते. त्यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांवर टिकास्त्र डागले. अजित पवारांचे बोलणे ऐकून मी शॉक झालो. त्यांच्याकडून खोटे बोलणे अपेक्षित नाही. जर त्यांनी औषधे मागवली असतील तर त्याचं एखादं नाव त्यांनी सांगावं, असा टोला महाजन यांनी लगावला.
गिरीश महाजन म्हणाले, लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांच्या मदतीने अमेरिकेतून औषधे मागवली होती. लक्ष्मण जगताप आजारी असताना त्यांच्यासाठी परदेशातून औषधे मागवल्याचे अजित पवार सांगतात. त्यांचे बोलणे ऐकून मला शॉक बसला. त्यांच्याकडून खोटे बोलणे अपेक्षित नाही. औषध मागवलं असेल तर त्यांनी त्याच एखादे नाव सांगावे.
काय म्हणाले होते अजित पवार?
लक्ष्मण जगताप यांना भाजपने आपल्या स्वार्थासाठी मतदान करण्यासाठी नेले. त्यामुळेच त्यांची दगदग झाली. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना मतदानासाठी घेऊन जायला नको होतं. जगताप हे आजारी असताना मीच त्यांना महागडी इंजेक्शन आणि औषध आणून दिली होती, असे अजित पवार यांनी चिंचवडमधील उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेत म्हटले होते.







