वृत्तसंस्था / टोकियो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफीक महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कझाकस्तानच्या इलिना रायबाकिनाने व्हिक्टोरिया मबोकोचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
आता 2025 च्या टेनिस हंगामाअखेरीस होणाऱ्या महिलांच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत रायबाकिनाने शेवटचे स्थान मिळविले आहे. पॅन पॅसिफीक स्पर्धेत रायबाकिनाचा उपांत्य फेरीचा सामना झेकच्या लिंडा नोस्कोव्हाशी होणार आहे.
पुढील महिन्यात डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धा सौदी अरेबियात 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत केवळ 8 महिला खेळाडूंना प्रवेश दिला जातो. आता या स्पर्धेत टॉपसिडेड आर्यना साबालेंका, इगा स्वायटेक, कोको गॉफ, अमंदा अॅनिसिमोव्हा, मॅडिसन किज, जेसीका पेगुला, जस्मीन पावोलिनी आणि रायबाकिना यांचा समावेश राहील. रियादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत अमेरिकेची कोको गॉफ ही विद्यमान विजेती आहे. गेल्या वर्षी गॉफने या स्पर्धेत ऑलिम्पिक चॅम्पियन क्विनवेनचा पराभव करत जेतेपदासह 4.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळविले होते.









