कोल्हापूर :
गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालक, एजंटांसह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा एजंट अमित अरुण शिंदे (वय 47 रा. लिशा हॉटेल जवळ, कोल्हापूर) याची 60 लाख रुपये किमतीची अलिशान कार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जप्त केली. पुणे येथील एका शोरुममध्ये ही कार लपविली होती.
गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. ट्रेडर्स, मालक लोहितसिंग सुभेदारसह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 नोव्हेंबर 2022 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास गतिमान झाल्यानंतर यामधील आरोपींची संख्या वाढली. आजपर्यंत कंपनीच्या 12 संचालकांची 13 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. कंपनीचा एजंट अमित शिंदे याने त्याची अलिशान कार पुणे येथील एका शोरुममध्ये लपविल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोथरुड येथील शोरुममधून ही कार जप्त केली. ही कार गुह्यामध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आली होती. दरम्यान ए. एस. फसवणूक प्रकरणात आजपर्यंत 13 कोटी 60 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मालमत्ता लिलावाची प्रक्रिया गतिमान झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय काळे, राजू येडगे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.








