आजच्या युगात मानवाने अशी नेत्रदीपक प्रगती साधली आहे की अधिक नाही तरी शंभर वर्षांपूर्वीच्या मानवाचे डोळेही आश्चर्याने विस्फारले जावेत. मानवाचे कुतुहल, चौकस बुद्धी आणि त्याने केलेली वैज्ञानिक प्रगती यामुळे हे स्थित्यंतर घडून आले आहे. आजचा मानव हा पृथ्वीचा तर विचार करतोच आहे. शिवाय बाह्य जगतातली, विश्वातली कोडी उलगडण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. याला अनुसरून भारतासारख्या विकसनशील देशात जेव्हा चांद्र मोहिमा आखल्या जातात तेव्हा काहीजण, देशातील जनतेचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. असे असताना चांद्र यानावर खर्च करून तेथील संशोधन करून काय साधणार आहे? असा प्रश्न उपस्थित करतात. वरकरणी हा प्रश्न बिनतोड वाटतो. परंतु थोडा तपशीलात विचार करता त्यातील फोलपणा जाणवतो. मुद्दा हा की आदी मानवापासून ते आतापर्यंत माणसाच्या राहणीमानात जे बदल होत गेले पूर्वीच्या तुलनेत जे सुरक्षित, सौख्यकारी जीवन त्याला लाभले. त्याच वैज्ञानिक शोधांचा व विकासाचा सिंहाचा वाटा आहे. कित्येक नवे शोध घेताना त्यांना दिलेला वेळ, वापरलेली बुद्धी, केलेला खर्च हे सारे व्यर्थ आहे. ते वस्तुस्थितीस धरून नाही असे आक्षेप नोंदविले गेले. परंतु लावलेल्या शोधांचा लाभ मानवास आणि त्याच्या पुढील पुढ्यांना होत गेल्याने हे आक्षेप निरर्थक ठरले. चांद्र मोहिमेवरील आक्षेपही त्याच परंपरेतील आहे. म्हणूनच अर्थहीन आहे.
नुकतेच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने ‘चांद्रयान-3’ ही मेहीम यशस्वी करून अंतराळ संशोधन क्षेत्रास लक्षणीय योगदान दिले आहे. विशेषत: चंद्राचा दक्षिण ध्रुवीय पृष्ठभाग जो चर आणि ख•s यांनी व्यापला आहे. म्हणून खडतर आहे. शिवाय जेथे रशियाचे लुना-25 यान अलीकडेच उतरविण्यात अपयशी ठरले. तेथेच भारताने आपले यान उतरवून नवा इतिहास रचला आहे. भारताची ही कामगिरी देशांतर्गत सर्वप्रकारच्या नव्या संशोधनास उत्तेजन देणारी आणि देशास या संदर्भात इतर महासत्तांच्या तुलनेत कंकणभर सरस ठरविणारी देखील आहे. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल 1969 साली टाकले ते अपोलो-11 या अमेरिकन यानातून. त्यानंतर चांद्र संशोधनास चालना मिळत गेली. अशाप्रकारचे संशोधन कशासाठी महत्त्वाचे आहे, याचाही आज घडीस विचार होणे संयुक्तिक आहे. मानवयुक्त किंवा मानवरहित चांद्र मोहिमेच्या निमित्ताने जे संशोधन होते ते केवळ त्या मोहिमेपुरतेच मर्यादित नसून वैद्यक शास्त्र, ऊर्जा क्षेत्र, इंधन, वातावरण याशिवाय सूर्यमालेचे अस्तित्व आणि त्यातील मानवाचे स्थान अशा अनेक क्षेत्रांना उपकारक व नवी दृष्टी देणारे ठरते. पृथ्वीची निर्मिती 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झाली. आपल्या पृथ्वीवर भूसांरचनिक प्रक्रियेने 3.8 अब्ज वर्षांपूर्वी आदीम अश्मांचे पुरावे नामशेष झाले. केवळ उल्कापातात अशनीच्या रूपात त्या सापडतात. चंद्रावर मात्र अशा अश्मांचे अधिक प्रमाणात अस्तित्व आहे. त्यांच्या अभ्यासावरून पृथ्वीवरील खंडांची उत्पत्ती, सागर निर्मितीच्या पाऊलखुणा, पृथ्वीवरील आदिकालीन वातावरणातील घटक यातील ज्ञानात अधिक भर पडू शकते. आज पृथ्वीवासीय हवामान बदल, जागतिक तापमानवाढ या समस्यांचा सामना करीत आहेत. ओझोन वायूचा थर कमी होणे, कर्बद्विल वायूचे प्रमाण वाढणे याचा हा परिणाम मानला जातो. चांद्र मोहिमातून या परिणामांच्या संशोधनास व त्यावरील उपायांस नवीदिशा मिळू शकते. तेथील खनिजे, बर्फ, पाणी यांचे अस्तित्वही पृथ्वीवरील मानवास त्यांच्या भवितव्यात उपयुक्त ठरणारे आहे. अशा प्रकारचे संशोधन समाजात
अज्ञानाच्या आधारावर पसरलेल्या अनेक अंधश्रध्दांना मूठमाती देत वैज्ञानिक मानसिकता रूजविण्यास मदत करणारे ठरते. वैज्ञानिक मोहीमांतून चंद्राचा अभ्यास पक्का झाल्यानंतर, आत्मविश्वास व प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे, मंगळ, सूर्य इतर दुरस्थ ग्रह, तारे यांचा अभ्यास व तेथील परिक्रमाही सुकर होण्याच्या शक्यता आहेत. ज्ञान अनुभवाच्या बळावर चंद्रावर सहल, तेथे वस्ती अशा कल्पनाही मानव रंगवू लागला आहे. ही अद्भूदता प्रत्यक्षात उतरवण्याच्या आशाही चांद्र मोहिमांनी जागृत केल्या आहेत.
चांद्र मोहिमांचा आरंभ जरी मानवाच्या ठायी असलेले विश्वाबद्दलचे कुतुहल आणि त्याची संशोधनात्मक वृत्ती यामुळे झाला असला तरी त्याला इतरही बाजू आहेत. ज्यांचा परामर्श घेणे या निमित्ताने योग्य ठरेल. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान नाझी जर्मनी या होऊ घातलेल्या आसुरी महासत्तेचा नायनाट झाला आणि अमेरिका व रशिया या दोन नव्या महासत्ता उदयास आल्या. त्यांच्यात विचारधारांच्या आधारावर शीतयुद्ध सुरू झाले. अमेरिकेने आधीच अणूबॉम्ब बनवून वरचष्मा प्रस्थापित केला होता. दुसरीकडे रशियानेही अमेरिकेस शह देण्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती करण्यास सुरूवात केली. या शस्त्रास्त्र स्पर्धेतील संशोधन व निर्मितीमुळे पुढे संगणक, आंतरजल सारखी माध्यमे निर्माण झाली. कालांतराने चांद्र मोहीम किंवा चंद्रावर स्वारी हा देखील उभयतांतील स्पर्धेचा भाग बनला. दुसऱ्या महायद्धा दरम्यान नाझी जर्मनीने लढाऊ विमाने आणि रॉकेट तंत्रज्ञान व निर्मितीत बरीच प्रगती साधली होती. युद्ध संपल्यानंतर अमेरिका व रशियाने या रॉकेट संशोधकांना पकडण्यासाठी प्रयत्न केले. अशावेळी जर्मन संशोधन गटाचे प्रमुख वेर्नर व्हान ब्रॉन अमेरिकेच्या हाती लागले. त्या अर्थाने त्यांच्याकडून मिळवलेले तंत्रज्ञान हे अमेरिकेच्या चांद्र मोहिमेच्या महत्वाकांक्षेस आकार देणारे ठरले. तथापि, सदर स्पर्धेत रशियाने अमेरिकेस मागे टाकत पहिल्यांदा 1957 साली स्पुटनिक हा मानवनिर्मित उपग्रह तयार केला. यामुळे रशिया अंतराळातून अमेरिकेवर रॉकेट हल्ला करेल अशी भीती पसरली. 1958 साली आयसेनहॉवर यांनी अमेरिकेत उपग्रह निर्मितीसाठी नासा व अंतरिक्ष प्रशासन या दोन संस्थांची उभारणी केली. 1961 रशियाने युरी गागारीन हा पहिला मानव अंतराळात पाठवला. त्यानंतर 1969 साली अपोलो-11 या अंतराळयानाद्वारे पहिला माणूस चंद्रावर पाठवून साऱ्या जगास अवाक केले. रशियावर स्पर्धात्मक यश मिळविले.
तेंव्हापासून आजपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पूर्वीच्या संशोधनास आणि चांद्र मोहिमेस संघर्ष, स्पर्धा, शस्त्रास्त्रs, युद्ध हे कोन लाभले असले तरी आज तितकी पराकोटीची परिस्थिती नाही. चांद्र मोहिमेसारख्या मोहिमा या मानवी हिताच्या दृष्टीने, पृथ्वी सुरक्षित राखण्यासाठी कशा उपयोगी ठरतील याचाही विचार होऊ लागला आहे. अंतराळ संशोधनात राष्ट्रांचे परस्पर सहकार्य देखील होत आहे. अशावेळी चांद्र मोहिमेतील भारताचे यश हे संशोधनास विवेकी मानवी चेहरा व शांततेचा संदेश देणारे आहे.
अनिल आजगांवकर








