117 जनावरांना लागण : तालुक्याच्या पूर्व भागात रोगाचा फैलाव अधिक : शेकडो जनावरे गंभीर आजारी : खबरदारीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांमध्ये होणाऱया लम्पिस्कीन या संसर्गजन्य गंभीर आजाराची आतापर्यंत 117 जनावरांना लागण झाली आहे. सहा जनावरे दगावली आहेत. विशेषतः बेळगाव तालुक्मयातील पूर्व भागात या रोगाचा अधिक फैलाव झाला आहे. त्यामुळे दगावलेली जनावरे या भागातीलच आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्यापही शेकडो जनावरे गंभीर आजारी आहेत. त्यामुळे धास्ती कायम आहे. बाधित जनावरे बरी होण्याचे प्रमाण अधिक असल्याने पशुसंगोपनसाठी ही दिलासादायक बाब आहे.
तालुक्मयाच्या पूर्व भागातील निलजी, सांबरा, मुतगा, बसरीकट्टी, शिंदोळी, बाळेकुंद्री, सुळेभावी, करडीगुद्दी, कणबर्गी, चंदनहोसूर, अष्टे-चंदगड आदी गावांतील जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. बसवन कुडची येथील 3, बसरीकट्टी येथील 2 तर सांबरा येथील एका बैलाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. या आजारावर अद्याप योग्य औषध उपलब्ध नसल्याने या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. संबंधित पशुपालकांना भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
पशुसंगोपन खात्याचे आवाहन
लम्पिस्कीन हा विषाणूजन्य रोग आहे. विशेषतः गायी-म्हशी आणि बैलांमध्ये हा आजार आढळून येतो. या आजारामुळे जनावरांच्या शरीरावर गाठी येतात. शिवाय जखमा होऊन रक्तस्राव होतो. त्यांची भूक मंदावते आणि दूधक्षमता कमी होते. पायांना सूज येते. जनावर लंगडते अशी लक्षणे दिसून येताच बाधित जनावरापासून निरोगी जनावरे वेगळी करावीत, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे.
गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या रोगाचा झपाटय़ाने फैलाव झाला आहे. त्यामुळे सीमा हद्दीवरील पशुपालकांनी जनावरांची ने-आण करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. बाधित जनावराला चावलेल्या डास आणि माशांपासून या रोगाची उत्पत्ती होते. त्यामुळे गोठय़ात मच्छरदाणीचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे. बैल आणि गायींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे जनावरे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाऊ नयेत, तसेच शर्यतीत बैलांना नेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
लक्षणे ओळखून उपचार
पूर्व भागात या रोगाची अधिक लागण झालेली दिसून येत आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपनच्या रॅपिड
ऍक्शन पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, बाधित जनावरांच्या गोठय़ात जाऊन तातडीने उपचार दिले जात आहेत. अद्याप लक्षणे ओळखून उपचार केले जात असल्यामुळे बाधित जनावरे बरी होण्याचे प्रमाण वाढत आहे.
जनावरांचे बाजार बंद
बेळगाव तालुक्मयात लम्पिस्कीन (त्वचा रोग) चा प्रादुर्भाव वाढल्याने एपीएमसी आणि हिरेबागेवाडी येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. बाजारातून या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता आहे. याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी बाजार बंद राहणार असल्याचे व्यापारी आणि खरेदीदारांना माहीत नसल्याने जनावरे घेऊन व्यापारी दाखल झाले होते. मात्र, एपीएमसीच्या प्रवेशद्वारावरच त्यांना जनावरांसोबत थांबावे लागले. मात्र, या रोगावर जोपर्यंत नियंत्रण येणार नाही, तोपर्यंत जनावरांचे आठवडी बाजार आणि शर्यतींवर बंदी राहणार आहे.
बाधित जनावरांवर तातडीने उपचार
जिल्हय़ात बेळगाव तालुक्मयातच या रोगाची अधिक लागण झाली आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपचार देण्यात येत आहेत. शिवाय रॅपिड ऍक्शन पथकाची नियुक्तीही केली आहे. बाधित जनावर आढळल्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंगोपन खात्याचे सहसंचालक डॉ. राजीव कुलेर यांनी केले.









