पशुसंगोपन खात्यामार्फत खबरदारी म्हणून मोहीम हाती : नुकसानग्रस्तांना 14 कोटींची भरपाई
बेळगाव : जिल्ह्यातील 4 लाख जनावरांना ‘लम्पी’ प्रतिबंधक लस दिली आहे. पशुसंगोपन खात्याने खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन गो-वंशीय जनावरांना लस दिली आहे. जनावरांना ‘लम्पी’ रोगाची लागण होऊ नये, यासाठी ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, बैल, आणि वासरांची संख्या मोठी आहे. सप्टेंबर दरम्यान ‘लम्पी’ रोगाने जिल्ह्यातील 25 हजाराहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. यामध्ये गाय आणि बैलांचा अधिक समावेश आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात बैल, गायी आणि वासरांना ही लस टोचण्यात आली आहे. सप्टेंबर ते मार्च दरम्यान जिल्ह्यातील 55 हजाराहून अधिक जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. त्यापैकी 3660 गायी, 3642 बैल व 953 वासरे दगावली होती. त्यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यापैकी काही पशुपालकांना शासकीय मदत मिळाली असली तरी काहीजण अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. एप्रिलनंतर या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दरम्यान पुन्हा या रोगांची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून खात्याने पावसाळ्यापूर्वीच मोहीम राबविली आहे.
भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव
जिल्ह्यात ‘लम्पी’ रोगाने दगावलेल्या जनावरांच्या मालकांना 14 कोटींची मदत दिली आहे. दगावलेल्या बैलासाठी 30 हजार, गायींसाठी 20 हजार तर वासरासाठी 5 हजार रुपये नुकसानभरपाई दिली आहे. ‘लम्पी’ने दगावलेल्या 8055 नुकसानग्रस्तांपैकी 6683 जनावर मालकांना भरपाई मिळाली आहे. उर्वरित नुकसानग्रस्त मालकांना भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच नुकसानभरपाई मिळणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.









