कसबा बीड/प्रतिनिधी
लंम्पीस्किन आजाराने मृत झालेल्या जनावरांना देण्यात येणारी मदत तोकडी असून ती वाढवावी,अशी मागणी आमदार पी.एन.पाटील (सडोलीकर)यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत केली. या मागणीबाबत तात्काळ ठराव करून शासनाकडे पाठवण्याचा निर्णय पालकमंत्री दिपक केसरकर यांनी घेतला. यावेळी वाडया वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व रस्त्यासाठी वनविभागाने परवानगी द्यावी अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आमदार पाटील यांनी लंम्पीने मृत झालेल्या गायीसाठी ३५ हजार, बैलासाठी २५ हजार व वासरासाठी दिली जाणारी १६ हजार रूपये ही मदत खूपच कमी आहे . जनावरे घेण्यासाठी शेतकरी लाखो रुपयांचे कर्ज घेतात. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून सदर रक्कम वाढवावी अशी मागणी केली. याबाबतचा ठराव लगेच करून शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.
विविध गावाअंतर्गत वाडीला जोडण्यात येणारे रस्ते व पिण्यासाठी पाईप लाईन वनविभाग हद्दीतून करावी लागते. मात्र यासाठी वनविभागाच्या नियमांचा अडथळा येतो. हा अडथळा दूर करून असे रस्ते अथवा पाईप लाईन करण्यास परवानगी द्यावी तसेच गवा रेड्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आ.पाटील यांनी केली. त्याचबरोबर निगवे दुमाला येथील क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून त्याठिकाणी देखरेख होत नाही. त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
याबाबत सदर अधिकाऱ्यासोबत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिले. लंम्पीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Previous Articleअधिवेशनाचा उत्तरार्ध आजपासून
Next Article सीमाबांधवांची आज कोल्हापुरात धडक









