ऑनलाईन टीम/तरुण भारत
लम्पी स्किन रोगाच्या नियंत्रणासाठी १० लाख लसीच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले.
अफवा पसरविल्यास कठोर कारवाई
पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, राज्यात लंपी स्किन रोगाचा झपाट्याने प्रसार होत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसेच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे कांही समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल.
जनजागृती करण्याची गरज
या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वत्र जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस व औषधांची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच लंपी स्किन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
औषधांची फवारणी करावी
हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी श्री सिंह यांनी सांगितले.
नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित
शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करून त्याअन्वये प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (१२) व (१३) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लम्पी स्किन रोगाच्या बाबतीत नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गाय व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबीस मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
घाबरू नका काळजी घ्या
सिंह यांनी सांगितले की, हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. ९.०९.२०२२ पर्यंत ७०,१८१ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरात मध्ये ५३४४ व हरियानामध्ये १८१० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सिंह यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.
त्वरित उपचार सुरू केल्यासलम्पी स्किन बरा होतो
लम्पी स्किन रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.









