देशपातळीवर सध्या लंपी चर्म रोगाने थैमान घातले आहे. खेडय़ापाडय़ातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील 12 राज्यात जवळजवळ 165 जिह्यातील 11.25 लाख गाई म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 14 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार 82 हजार 066 गाई, म्हशी लंपी रोगाला बळी पडल्या आहेत. यावरून आपल्याला या वाढत्या रोग प्रादुर्भावाचा अंदाज येऊ शकतो. यावर युद्धपातळीवर उपाययोजना राबवणे हाच पर्याय असू शकतो.
जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या (OIE) अहवालानुसार सदर रोगाचा प्रादुर्भाव हा जगातील अनेक देशात सन 2010 पासून सुरु झाला. मोझांबीक या देशात सर्वप्रथम या रोगाचे पशुरुग्ण आढळले. नंतर मग हळूहळू अनेक देशात त्याचा प्रसार झाला. भारतात 12/8/2019 रोजी ओरिसा राज्यात मयूरगंज या जिह्यातील काही जनावरे बाधित आढळली. नंतर मग 16/11/2019 रोजी या रोगाचे निदान प्रयोगशाळेत झाले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर मात्र 2020 पासून बांगलादेश, चीन, भारतात कुठे ना कुठे या रोगाचा प्रादुर्भाव होत गेला. पण आता मे जून 2022 पासून आपल्या देशात या रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे अनेक जनावरे संक्रमित झाली असून आजही या रोगाचा प्रसार वेगाने सुरू आहे.
‘कॅप्रीपॉक्स’ विषाणू जो शेळय़ा मेंढय़ांमध्ये देवी या रोगाचा प्रसार करतो त्याच समूहातील हा विषाणू आहे. प्रामुख्याने देशी गाई, संकरित गाई या मोठय़ा प्रमाणात बाधित होतात. पुढे जाऊन काही प्रमाणात म्हशीनासुद्धा या रोगाची लागण होते. तथापि शेळय़ा-मेंढय़ांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आज अखेर जगात कुठेही या रोगाचे संक्रमण मानवात झालेले आढळले नाही ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे.
रोगप्रसार- या रोगाचा प्रसार मुख्यत्वे करून परजीवी कीटक विशेषतः डास, गोचीड, गोमाश्या, घरातील माशा त्याचबरोबर बाधित जनावरांच्या नाकातील, डोळय़ातील स्त्रावाने दूषित चारापाणी यामुळे होतो. बाधित जनावरांची वाहतूक, नवीन जनावरांची खरेदी त्यामुळेदेखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. पुष्कळ वेळा बाधित जनावरांचा संपर्क, बाधित मातेच्या दुधावाटे तसेच कासेवरील फोड, गाठी यामुळे झालेल्या जखमातून आणि जखमावरील खपल्यामधूनसुद्धा या रोगाचा प्रसार होतो.
आजाराची लक्षणे- या आजाराची लक्षणेसुद्धा खूप वेगवेगळी आहेत. सर्व लक्षणे एकाच जनावरात दिसतीलच असे नाही. साधारणपणे विषाणू शरीरात प्रवेश केल्यापासून चार दिवसापासून त्या पाच आठवडय़ापर्यंत केव्हाही या रोगाची लक्षणे दिसतात. शरीराचे तापमान वाढते. भूक मंदावते. लसिकाग्रंथी सुजतात. दूध उत्पादन कमी होते. नाका डोळय़ातून स्त्राव येतो. नंतर मग शरीरावर एक ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी तयार होतात. त्या अनेकवेळा खोल मांसापर्यंत जातात. तोंडातील भाग, श्वासनलिका या ठिकाणी या प्रकारच्या गाठी, अल्सर निर्माण होतात. डोळय़ातदेखील अल्सर होतात. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. गाठीमध्ये जखमा होऊन पुष्कळवेळा जनावरे लंगडतात. वाढलेली प्रचंड भटक्मया जनावरांची संख्या, त्यांची कमी असलेली रोगप्रतिकारशक्ती, त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक गोशाळा आणि त्यामधील जनावरांची गर्दी सोबतच आरोग्य दर्जा यामुळे मोठय़ा प्रमाणात या रोगाचा प्रसार गुजरात, राजस्थान या ठिकाणी झाला असल्याचे आढळले आहे. सोबतच पावसामुळे वाढलेल्या माशा, गोमाशा, गोचीड यामुळे देखील या रोगाचा प्रसार वेगाने झाल्याचे निदर्शनाला आले आहे.
आर्थिक नुकसान- या रोगामुळे होणारे आर्थिक नुकसानदेखील दुग्ध व्यवसायावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. लंपी ‘चर्म’रोग वरून आपल्या लक्षात येईल की मोठय़ा प्रमाणात या रोगाची लक्षणे ही जनावरांच्या कातडीवर आढळून येत असल्यामुळे चर्म उद्योगाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. पुष्कळवेळा गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो त्यामुळे ते वेत फुकट जाते. त्याचबरोबर संक्रमण काळात मोठय़ा प्रमाणात दूध उत्पादन घटते. जनावरे अशक्त होत असल्याने त्यांना पुन्हा उत्पादनात आणण्यासाठी मोठा खर्च होतो. त्याचबरोबर कासेवर जर जखमा झाल्या तर त्यांना मोठय़ा प्रमाणात स्तनदाह होतो, परिणामी औषध उपचारासह पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबत जर मोठय़ा प्रमाणात भटकी जनावरे, गोशाळांमधील पशुधन मृत्यूमुखी पडले तर त्यांची विल्हेवाट लावणे देखील जिकिरीचे ठरते ही वस्तुस्थिती आहे.
औषधोपचार- औषधोपचाराचा भाग म्हणून प्रतिजैवके देण्यापासून, वेदनाशामक औषधे, जीवनसत्वे त्याचबरोबर जखमांची स्वच्छता, यावर माशा बसू नयेत म्हणून स्प्रे वापरणे सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे आहे परिसर स्वच्छता. गोचीड, गोमाश्या, माशा यांचे निर्मूलन मोठय़ा प्रमाणात होणे आवश्यक ठरते. हे कामसुद्धा युद्धपातळीवर एकाचवेळी बाधित विभागाच्या परिसरात झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषदा यांनी पुढाकार घेणे अत्याशक ठरते. त्याचबरोबर या रोगावर ‘गोटपॉक्स’ (शेळय़ांमधील देवी) या रोगासाठी वापरली जाणारी लस ही प्रभावी ठरल्यामुळे लसीकरणासाठी त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. ही लस फक्त बाधित ठिकाणच्या पाच किमी त्रिज्येत एक मिली कातडीखाली याप्रमाणे टोचली जाते. सोबत अनेक भागात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक या उपचाराचादेखील वापर सुरू केला आहे. या सर्व उपचाराबरोबर ‘प्रतिबंधक उपाय’ हे योग्य प्रमाणात यशस्वी होताना दिसतात.प्रतिबंधक उपाय- यामध्ये मुख्यत्वे करून बाधित जनावरे विलगीकरणात ठेवणे, त्यांची सेवा शुश्रुषा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे, संक्रमण काळात नवीन जनावरांची खरेदी विक्रीवरील बंदी, त्याचबरोबर बाधित भागापासून दहा किमी परिसरातील बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने, बैलगाडी शर्यती यावर बंदी आणणे, परिसर स्वच्छता, मृत जनावरांची खोला आठ फूट खड्डय़ात गाडून खाली आणि वर चुन्याची पावडर टाकून विल्हेवाट लावणे अशा प्रकारच्या प्रतिबंधक उपायांची गरज आहे. अशा प्रतिबंधक उपचारासाठी पशुपालकासह पशुसंवर्धन, महसूल, ग्रामीण विकास यंत्रणा यांनी एकमेकांशी सहकार्याने कार्यरत होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच याचे दृश्य परिणाम लवकर मिळतील व मोठय़ा प्रमाणात रोगाचा प्रसार रोखता येईल.
महाराष्ट्राच्याबाबतीत 7 सप्टेंबर 22 अखेर एकूण 17 जिह्यातील 59 तालुक्मयामधील 161 गावे प्रभावित झाली आहेत. एकूण 280075 इतक्मया पशुधनाचे लसीकरण देखील झाले आहे. प्रत्यक्ष बाधित भागात सर्व राज्यात मा. आयुक्त महोदय यांच्यासह दौरा करून, आढावा घेतलेल्या डॉ. धनंजय परकाळे अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, यांनी नुकत्याच ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फाउंडेशन सांगली आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनारमध्ये काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बाधित जनावरे ही पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱयांना सात ते आठ दिवसांनी निदर्शनास येतात किंवा आणली जातात. त्यामुळे उपचारास विलंब होतो. इतर रोगाचे संक्रमण होऊन उपचारास प्रतिसाद कमी मिळू शकतो, खर्च वाढतो. त्याचबरोबर जी लक्षणे आहेत त्यामध्येसुद्धा खूप भिन्नता असल्याने नेमके निदान व्हायला अडचणी येऊ शकतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे अनेक पशुपालक जर बैलांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर थोडे दुर्लक्ष करतात. अनेक ठिकाणी सहविकृतीमुळेसुद्धा जनावरांचा मृत्यू होताना दिसतो. त्यामुळे थायलेरिअसिस, बबेसिओसीस अशा सहविकृतीसह जर लंपीचर्म आजार दिसला तर त्यावर उपचार करताना सर्वंकष विचार करून उपचार केला जावा. तथापि लसीकरणानंतर रोगप्रतिकार शक्ती निर्माण व्हायला 15 ते 21 दिवस लागतात. लसीकरणानंतर जनावरे चरायला सोडणे, इतर योग्य काळजी न घेणे ते देखील अयोग्य असल्याचे निदर्शनास आणले. त्याचबरोबर रोगप्रसारासाठी कारणीभूत कीटकांचा बंदोबस्त केल्यास चांगल्याप्रकारे रोग नियंत्रणात आणता येईल. प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात जागेवर जाऊन नोंदवलेली ही निरीक्षणे निश्चितच पशुपालकांनी व पशुवैद्यकांनी इतर सर्व बाबीसह विचारात घेणे आवश्यक ठरते. एकंदरीतच ज्या पद्धतीने कोविड काळात सर्वांनी सजग राहून लसीकरण आणि जनजागृतीच्या बाबतीत पुढाकार घेतला गेला त्या पद्धतीने सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सोबतच लसीचा पुरवठा आणि उत्पादन याकडेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. खाजगी लस उत्पादकांना प्रोत्साहन देऊन पुरेसा साठा उत्पादित होणे आवश्यकच आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांनी नुकतेच या लंपी चर्म रोगावर भारतीय बनावटीची लस निर्माण केली आहे. ती लवकरच उपलब्ध होईल त्यासाठी अशा संस्थांनी या बाबीकडे थोडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून लवकरात लवकर कारवाई केल्यास त्याचा निश्चित फायदा देशातील दुग्धव्यवसायास होईल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे








