किरकोळ प्रमाणात लक्षणे : पशुसंगोपन खात्याचे आवाहन
बेळगाव : जिल्ह्यात आणि परजिल्ह्यात लम्पीसदृश रोगाची जनावरे किरकोळ प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लम्पी रोगाची लक्षणे जनावरांमध्ये दिसून आल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात लम्पी रोगाने धुमाकूळ घातला होता. दरम्यान, 25 हजारहून अधिक गो-वर्गीय जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका सहन करावा लागला. सद्यस्थितीत या रोगाचा फैलाव कमी असला तरी किरकोळ प्रमाणात जनावरांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी घेऊन वेळीच औषधोपचार करणे आवश्यक आहे.
गो-वर्गीय जनावरांमध्ये रोगाची लागण अधिक
या रोगाची लागण गो-वर्गीय जनावरांमध्ये अधिक होते. यासाठी खात्याने प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली आहे. बेळगाव जिल्ह्यात या रोगाचा फैलाव सद्यस्थितीत कमी असला तरी किरकोळ प्रमाणात लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगाबाबतची लक्षणे दिसून आल्यास सावधानता म्हणून तातडीने उपचार करून घेणे आवश्यक आहे.
जनावरांची वाहतूक पूर्णपणे थांबवा
लम्पी हा विषाणूजन्य चर्मरोग असल्याने रोगाची तीव्रता वाढल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. विशेषत: गो-वर्गीय जनावरांना या रोगाची लागण होत असल्याने दूध क्षमता घटून पशुपालकांना फटका बसतो. यासाठी पशुपालकांनी इतर जिल्ह्यांतून जनावरांची वाहतूक करू नये. विशेषत: बेळगाव, हुक्केरी, चिकोडी, खानापूर, अथणी या सीमाभागातील पशुपालकांनी इतर राज्यांतून जनावरांची वाहतूक पूर्णपणे थांबवावी, असे आवाहनही पशुसंगोपनने केले आहे.









