जिल्हय़ात 10312 जनावरांना लागण, 3837 जनावरे लम्पीमुक्त, 104976 जनावरांचे लसीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात लम्पी संसर्गजन्य रोगाची आतापर्यंत 10312 जनावरांना लागण झाली आहे. तर त्यापैकी 3837 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. तर चिंताजनक बाब म्हणजे 680 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांमध्ये गोवंशीय गाय-बैलांचा समावेश आहे. त्यामुळे दूध उत्पादनावर आणि शेतीकामावर देखील परिणाम झाला आहे.
मागील तीन महिन्यांपासून जिल्हय़ात या रोगाचा शिरकाव होऊन फैलाव सुरू आहे. विशेषतः बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्मयात लम्पी लागण झालेली जनावरे अधिक आहेत. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण देखील या तीन तालुक्मयांमध्ये अधिक आहे. दरम्यान रोगाला आळा घालण्यासाठी पशुसंगोपनमार्फत लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक सक्रियपणे राबविली जात आहे. मात्र काही शेतकरी जनावरांना लसीकरण करून घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर काही ठिकाणी प्रतिबंधक लसीकरण झालेल्या जनावरांना लम्पीची लागण झाल्याचेही समोर आले आहे. अशा जनावरांवर उपचार केले जात आहेत.जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ा, घोडा, कुत्रा, डुक्कर, मांजर आदींचा समावेश आहे. मात्र केवळ गोवर्गीय जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. बैल आणि गायींमध्ये लम्पीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे या जनावरांना लम्पीचा धोका निर्माण झाला आहे. रोगाचा अटकाव करण्यासाठी आतापर्यंत 1,04,976 गाय-बैल आणि वासरांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे रोगाचा फैलाव काही प्रमाणात कमी झाला आहे.लम्पीने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. दगावलेल्या बैलासाठी 30 हजार, गायीसाठी 20 हजार तर वासरासाठी 5 हजार मदत दिली जात आहे. त्यामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र बाजारभावाची तुलना करता दगावलेल्या जनावरांसाठी दिली जाणारी शासनाची मदत तुटपुंजी असल्याचेही शेतकऱयांतून बोलले जात आहे. जिल्हय़ात 10312 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तर 680 जनावरे दगावली आहेत. यामध्ये दुभत्या जनावरांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण दूध उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. आधीच महागाई व त्यात पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच लम्पीने धुमाकूळ घातल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सुगी हंगामाला प्रारंभ झाल्याने लम्पीने बैल गमावलेल्या शेतकऱयांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
लसीकरणामुळे फैलाव कमी
जिल्हय़ात लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. त्यामुळे रोगाचा फैलाव कमी झाला आहे. लम्पीतून बऱया होणाऱया जनावरांची संख्या देखील वाढत आहे. केवळ दोन-तीन तालुक्मयांमध्येच लम्पीची लागण अधिक आहे.
-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)
तालुकानिहाय लागण, मृत्यू आणि लसीकरण झालेली जनावरे
| तालुके | लागण झालेली जनावरे | दगावलेली जनावरे | लसीकरण झालेली जनावरे |
| अथणी | 536 | 14 | 9200 |
| कागवाड | 717 | 32 | 8200 |
| बेळगाव | 2623 | 274 | 40700 |
| बैलहोंगल | 1182 | 85 | 5600 |
| चिकोडी | 272 | 9 | 4705 |
| गोकाक | 899 | 58 | 4400 |
| हुक्केरी | 184 | 17 | 9804 |
| कित्तूर | 69 | 0 | 4000 |
| खानापूर | 24 | 2 | 2751 |
| मुडलगी | 158 | 7 | 4984 |
| रामदुर्ग | 1726 | 110 | 2000 |
| निपाणी | 116 | 10 | 3000 |
| सौंदत्ती | 1415 | 48 | 2000 |
| रायबाग | 391 | 14 | 3632 |
| एकूण | 10312 | 680 | 1,04976 |









