निपाणीत शिरकाव : रोगापासून दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यक : पशुसंगोपन चिंतेत
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यात संसर्ग वाढलेल्या ‘लम्पी’चा शिरकाव आता निपाणी तालुक्यात झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. गतवर्षी या रोगाने जिल्ह्यातील तब्बल 25 हजारहून अधिक जनावरे दगावली होती. त्यामुळे मोठा फटका बसला होता. यंदा पुन्हा या रोगाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याने पशुसंगोपन खात्याची डोकेदुखी वाढली आहे. जनावरांवर वेळीच उपचार न झाल्यास दगाविण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगाची लक्षणे दिसताच तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे. या रोगांची विशेषत गो-वर्गीय जनावरांना अधिक लागण होत आहे. निपाणी परिसरातील 5 ते 6 गायींना याची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. संसर्गजन्य रोग असल्यामुळे झपाट्याने फैलावतो. त्यामुळे आता पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषत: बैल, गाय, वासरांना या रोगांची अधिक प्रमाणात लागण होते. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे.
गतवर्षी दुभत्या जनावरांनाही लागण होऊन दूध क्षमतेवर परिणाम झाला होता. पशुपालकांचे अर्थकरण अडचणीत आले होते. जिल्ह्यात तब्बल 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 12 लाख गो-वर्गीय जनावरे आहेत. डांस, माशांपासून या रोगांचा फैलाव होतो. सुरुवातीला जनावरांच्या अंगावर दोन ते पाच सेंटीमीटरच्या गाठी होऊन रोगांची लागण होते. बाधित जनावर पूर्णपणे अशक्त होऊन दूध क्षमताही घटते. अतिप्रमाणात रोगाची लागण झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. रोगांची लक्षण दिसताच तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. गतवर्षी लम्पीने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने मदत जाहीर केली होती. बैलासाठी 30, गायीसाठी 20 आणि वासरासाठी 5 हजार आर्थिक मदत दिली होती. मात्र शेवटच्या टप्प्यातील नुकसानग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त पशुपालक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पुन्हा लम्पीचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे.
सीमाहद्दीवर प्रादुर्भाव अधिक
बेळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या रोगाची जनावरे अधिक आढळून आली आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या निपाणी, चिकोडी, बेळगाव, कागवाड, हुक्केरी तालुक्यात अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सीमाहद्दीवरील पशुपालकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे.
शर्यता-बाजारपेठेत नेणे टाळावे
शर्यती व जनावरांच्या बाजारातून या रोगाचा फैलाव वाढू शकतो. त्यामुळे बैल जनावरांना शर्यतीला नेणे टाळावे तसेच काही काळाकरिता शर्यती आयोजन करू नये, लागण झालेल्या जनावरांना बाहेर चरण्यासाठी किंवा विक्रीसाठी नेऊ नये, असे आवाहनही पशुखात्यातर्फे करण्यात आले आहे.
संर्पक साधा-डॉ. राजीव कुलेर (पशुसंगोपन खाते, सहसंचालक)
निपाणी तालुक्यात लम्पीची काही जनावरे आढळून आली आहे. त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय खबरदारी म्हणून यापूर्वी सर्वत्र लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. लक्षणे आढळून येताच जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधवा.
नियंत्रण
- बाधीत जनावर वेगळे ठेवणे.
- बाधीत आणि निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत.
- बाधीत भागातून जनावरांची ने-आण करू नये.
- बाधीत जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य, परिसर निर्जंतूक करावे
- माशा, डास, चिलटे व गोचीड आदींचे निर्मूलन करावे
- गोठा दररोज स्वच्छ करावा
प्रसार
- माश्या, डास, गोचीड, चिलटे
- बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष स्पर्शाने लक्षणे
- प्रथम जनावराच्या डोळे, नाकातून पाणी येते.
- एक आठवडाभर भरपूर ताप येतो. दुग्ध क्षमता कमी होते.
- त्वचेवर हळुहळू 10 ते 50 मी.मी. व्यासाच्या गाठी येतात
- काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात जखमा होतात.
- सांधे व पायामध्ये सूज येऊन जनावर लगडते.
उपचार
रोग विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. पण रोगाबरोबर गुतागूंत होऊ नये, म्हणून योग्य उपचार तातडीने करून घेतल्यास जनावर पूर्णपणे बरे होते.









