रोग नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान, काही ठिकाणी आटोक्मयात, पशुपालकांची चिंता कायम
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयात लम्पिस्कीन या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातल्याने पशुसंगोपन खात्याची डोकेदुखी वाढली आहे. तब्बल 117 हून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंगोपनची धडपड सुरू असली तरी अद्याप त्याला म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे रोगाला हद्दपार करण्याचे आव्हान पशुसंगोपन विभागासमोर आहे.
तालुक्मयाच्या पूर्व भागातील निलजी, सांबरा, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सुळेभावी, बाळेकुंद्री, चंदनहोसूर, कणबर्गी आदी गावातील जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 6 जनावरे या रोगाने दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱयांची धास्ती वाढली आहे. 117 जनावरांना लागण झाली असली तरी त्यापैकी 40 जनावरे पूर्णपणे बरी झाल्याची माहिती देखील पशुसंगोपनने दिली आहे. मात्र अद्याप ही जनावरे या आजाराने गंभीर असल्याने पशुपालकांची चिंता मात्र कायम आहे. लम्पिस्कीन हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा फैलाव वेगाने होतो. त्यामुळे पूर्व भागातील सर्व गावांमध्ये या रोगाची लक्षणे असलेली जनावरे आढळून आली आहेत. दरम्यान, पशुसंगोपनने रोगावर नियंत्रण आणण्यासाठी रॅपिड ऍक्शन पथकाची नियुक्ती केली आहे. बाधित जनावरांच्या गोठय़ात जाऊन तातडीने उपचार दिले जात आहेत. मात्र या आजारातून बरे होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या कालावधी लागत आहे. या आजारावर अद्याप प्रतिबंधक लस किंवा योग्य औषध नसल्याने लक्षणावरून उपचार केले जात आहेत. दरम्यान शरीराने कमकुवत असलेल्या जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे पशुसंगोपनसमोर डोकेदुखी वाढली आहे.
हा नवीनच आजार असल्याने पशुपालक या आजाराबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे गावोगावी लम्पिस्कीनबाबत जागृती वाढवावी, अशी मागणी देखील होत आहे. या आजारामुळे जनावरांच्या शरीरावर गाठी येऊन जनावर अशक्त होणे, दूध क्षमता कमी होऊन जनावर आजारी पडणे, भूक मंदावणे, रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनावरांचे आठवडी बाजार-शर्यती बंद ठेवण्याचा आदेश
बेळगाव तालुक्मयात जनावरांमध्ये त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने आठवडी बाजार बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. एपीएमसी आणि हिरेबागेवाडी येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद राहणार आहे. शिवाय बैलांच्या शर्यतींवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने बाधित जनावरांपासून निरोगी जनावराला याची तात्काळ लागण होते. त्यामुळे जनावरांचे आठवडी बाजार आणि शर्यती बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
बसरीकट्टी येथे बैलाचा मृत्यू

तालुक्मयाच्या पूर्व भागांमध्ये लम्पिस्कीन या रोगाने जनावरे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच असून सोमवारी बसरीकट्टी येथे लम्पिस्कीन रोगाने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पूर्व भागांमध्ये लम्पिस्कीन रोगांने मृत्यू पावलेल्या जनावरांची संख्या सातवर पोहोचली आहे.
पूर्व भागातील बसवण कुडची, शिंदोळी, बसरीकट्टी, निलजी, मुतगा, सांबरा आदी गावांमध्ये लम्पिस्किन या रोगाची मोठय़ा प्रमाणावर जनावरांना लागण झाली आहे. आतापर्यंत बसवन कुडची येथे तीन, बसरीकट्टी येथे तीन व सांबरा येथे एका जनावराचा मृत्यू झाला असून आणखीन बरीच जनावरे या रोगाशी झुंज देत आहेत. बसरीकट्टी येथील शेतकरी होनाप्पा इराप्पा मोदगेकर यांच्या बैलाला गेल्या काही दिवसापासून लम्पिस्कीन रोगाची लागण झाली होती. बैलावर उपचारही सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने सोमवारी बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण कायम आहे.









