दिल्ली विमानतळावर एनआयएची कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लुधियाना बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड हरप्रीत सिंग याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. हरप्रीत पाकिस्तानस्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे प्रमुख लखबीर सिंग रोडे याचा सहकारी आहे. डिसेंबर 2021 मध्ये लुधियाना न्यायालय इमारत स्फोटाचा कट रचणाऱयांपैकी हरप्रीत हा एक होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता, तर दहाहून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने 13 जानेवारी रोजी या प्रकरणात हरप्रीत सिंग याचा सहभाग असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती.
हरप्रीत सिंग हा स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीसह विविध प्रकरणांमध्ये सामील असल्याने तो तपास यंत्रणांच्या हिटलिस्टवर होता. यापूर्वी एनआयएने हरप्रीत सिंगवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. विशेष एनआयए न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि त्याच्याविरुद्ध लुक आउट सर्क्युलर (एलओसी) देखील जारी केले होते. वाँटेड दहशतवादी आणि लुधियाना न्यायालय बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड हरप्रीत सिंग याला अटक केल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयाने शुक्रवारी दिली.
पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ ‘हॅपी मलेशिया’ याला क्वालालंपूरहून विमानतळावर आल्यानंतर अटक करण्यात आली. तो लुधियाना न्यायालय इमारत बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱयांपैकी मुख्य सूत्रधार असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानातून मिळालेल्या निर्देशानुसार हरप्रीत याने भारतात आपल्या साथीदारांना आयईडीचा पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. लुधियाना न्यायालय कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.