वृत्तसंस्थ/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत शनिवारी येथे लखनौ सुपर जायंटस् आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वा. प्रारंभ होणार आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात लखनौचा संघ सध्या दुसऱ्या स्थानावर असून आता या संघाचे लक्ष्य अग्रस्थानावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघासमोर फलंदाजीची समस्या सातत्याने जाणवत आहे.
शिखर धवनच्या पंजाब किंग्जने आतापर्यंत या स्पर्धेत चार सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर दोन सामने गमविले आहेत. पंजाबचा संघ 4 गुणासह सहाव्या स्थनावर आहे. लखनौ सुपर जायंटस्ने या स्पर्धेत आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकले असून एक सामना गमवित ते 6 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थानने गुणतक्त्यात 6 गुणासह आघाडीचे स्थान मिळवताना सरस धावसंख्या राखली आहे.
पंजाब किंग्ज संघाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ करताना सलग दोन विजय मिळविले. पण त्यानंतर पुढील दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात कर्णधार शिखर धवनने एकाकी लढत देत शानदार फलंदाजी केली होती. पण गुजरात विरुद्धच्या सामन्यात धवनला त्याच्या साथिदारांकडून साथ मिळू शकली नाही. पंजाबच्या मधल्या फळीतील फलंदाजांना 10 ते 15 षटकांच्या दरम्यान धावांची गती वाढवता आलेली नाही. कर्णधार धवनने या स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात अनुक्रमे 40, नाबाद 86 आणि नाबाद 99 धावा झळकाविल्या होत्या. धवनची फलंदाजी निश्चितच बहरत आहे. पण त्याला पुरेशी साथ मिळत नाही. या संघातील सलामीचा फलंदाज प्रभसिमरन सिंग पहिल्याच सामन्यात आक्रमक फलंदाजी करु शकला. पण त्यानंतरच्या तीन सामन्यात तो अपयशी ठरला. मॅथ्यू शॉर्ट आणि जितेश शर्मा फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. पंजाब संघाची गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांच्यावर आहे. अर्शदीप सिंगने गेल्या चार सामन्यात किफायतशीर गोलंदाजी केली आहे.
लखनौ सुपर जायंटस् संघाचा कर्णधार के. एल. राहूल फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. या संघातील कृणाल पांड्याकडून बऱ्यापैकी अष्टपैलू कामगिरी होत आहे. हैद्राबाद संघाविरुद्ध कृणालची कामगिरी निर्णायक ठरली होती. तर या संघातील विंडीजचा फलंदाज निकोलस पूरनची तूफान फटकेबाजी बेंगळूर संघाविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची ठरली होती. पूरनच्या फटकेबाजीमुळेच लखनौने बेंगळूर संघाला विजयासाठी 212 धावांचे कठीण आव्हान दिले होते. लखनौ सुपर जायंटस्चा संघ इतर संघांच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात समतोल वाटतो. या संघाची फलंदाजी तसेच गोलंदाजीही सातत्याने चांगली होत आहे. या संघातील सलामीचा फलंदाज मेयर्सने पहिल्या दोन सामन्यात बऱ्यापैकी धावा जमविल्या. तर त्यानंतर स्टोईनिस, पूरन व बदोनी यांनी मधल्या फळीत उपयुक्त धावा जमवित आपल्या संघा विजय मिळवून दिला. दिपक हुडा मात्र फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. मार्क वूड, आवेश खान, रवी बिस्नॉई, अमित मिश्रा व कृणाल पांड्या हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), अर्शदीप सिंग, बालतेज सिंग, राहूल चहर, सॅम करन, रिषी धवन, नाथन इलिस, जी. ब्रार, हरप्रित ब्रार, हरप्रित सिंग, कवीरप्पा, लिव्हिंगस्टोन, राठी, प्रभसिमरन सिंग, रबाडा, राजपक्ष, शाहरुख खान, जितेश शर्मा, शिवम सिंग, मॅथ्यू शॉर्ट, सिकंदर रझा, अथर्व तायडे.
लखनौ सुपर जायंटस् : के. एल. राहूल (कर्णधार), मेअर्स, दिपक हुडा, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, पूरन, नवीन उल हक, बदोनी, आवेश खान, कर्ण शर्मा, चरक, यश ठाकूर, शेफर्ड, मार्क वूड, स्वप्निल सिंग, मनन व्होरा, सॅम्स, मंकड, के. गौतम, उनादकट, स्टोईनिस, बिस्नॉई आणि मयांक यादव.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.