आयपीएल साखळी फेरीत 9 सामन्यातील सहावा विजय, पंजाब किंग्सला 20 धावांनी हरवले
सुकृत मोकाशी / पुणे
लखनौ सुपर जायंट्सने आत्मघात करुन घेणाऱया पंजाब किंग्सच्या चुकींचा उत्तम लाभ घेत आयपीएल साखळी सामन्यात 20 धावांनी विजय संपादन केला. येथील गहुंजे स्टेडियमवर रंगलेल्या या लढतीत लखनौने 8 बाद 153 धावा केल्या तर प्रत्युत्तरात पंजाबला 20 षटकात 8 बाद 133 धावांवर समाधान मानावे लागले.

कॅगिसो रबाडाने 4 बळी घेतल्यानंतर पंजाबने लखनौला माफक धावसंख्येत रोखले. मात्र, पंजाबने सहज विजयाची संधी गमावणे आश्चर्याचे ठरले. त्यांना 20 षटकात 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. पेसर दुष्मंता चमीरा (2-17), कृणाल पंडय़ा (2-11) यांनी उत्तम मारा करत पंजाबला रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. डावखुरा पेसर मोहसिन खानने 3 बळी घेतले.पंजाबच्या मयांक अगरवाल (25), लिव्हिंगस्टोन (18) व जॉनी बेअरस्टो (32) यांना शानदार प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही. ऋषी धवनने नाबाद 21 धावांसह सर्वोत्तम प्रयत्न केले. पण, तोवर हा सामना पंजाबच्या हातातून निसटला होता.
आयपीएलचे पदार्पणवीर लखनौसाठी हा 9 सामन्यातील सहावा विजय असून यासह ते प्ले-ऑफच्या उंबरठय़ावर पोहोचले आहेत. याचवेळी पंजाबसाठी हा 9 सामन्यातील 5 वा पराभव आहे.
प्रारंभी, क्विन्टॉन डी कॉक (46) व दीपक हुडा (34) यांनी लखनौच्या डावात आश्वासक फलंदाजी साकारली. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 85 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी नोंदवली. लखनौचे सलामीवीर राहुल आणि डी कॉक यांना चांगली सलामी देता आली नाही. धावसंख्या 13 असताना मागच्या सामन्यातील शतकवीर राहुल अवघ्या सहा धावांवर परतला. त्याला रबाडाने जीतेश शर्माकरवी झेलबाद केले. यानंतर डिकॉक आणि हुडा यांनी डाव सावरला. या दोघांनी पॉवरप्लेच्या सहा षटकात 1 बाद 39 पर्यंत धावसंख्या नेली. तर, दहा षटकात 67 धावा झाल्या होत्या. हे दोघे आपली अर्धशतके पूर्ण करतील अशी चिन्हे असतानाच धावसंख्या 98 वर असताना डी कॉक 46 धावांवर बाद झाला. त्याला संदीप शर्माने जीतेश शर्माकरवी झेलबाद केले. हुडा आणि डी कॉक यांच्यात 85 धावांची भागीदारी झाली.
डी कॉक बाद झाल्यावर लखनौला एकामागोमाग एक धक्के बसत गेले. हुडाला बेअरस्टोने धावबाद केले. त्याने 34 धावा केल्या. यानंतर आलेल्या कृणाल पंडय़ालाही चमक दाखवता आली नाही. त्याला रबाडाने धवनकरवी 7 धावांवर झेलबाद केले. यानंतर आलेल्या बदोनीला रबाडाने तंबूचा रस्ता दाखवला. लिव्हिंगस्टोनने त्याचा झेल घेतला. एकाच षटकात रबाडाने या दोघांना बाद केले. यावेळी लखनौचा डाव 1 बाद 98 वरुन 5 बाद 109 असा गडगडला.
यानंतर 111 धावसंख्या असताना स्टोइनिसही अवघ्या एका धावेवर बाद झाला. चहरने स्वतःच्याच गोलंदाजीवर सूर मारुन त्याचा अप्रतिम झेल घेतला. होल्डरही 11 धावा काढून बाद झाला. चहरने शर्माकरवी त्याला झेलबाद केले. यानंतर चमीरा रबाडाचे सावज ठरला. लखनौचा डाव 20 षटकात 8 बाद 153 धावांवर रोखला गेला. पंजाबकडून रबाडाने चार, चहरने दोन तर शर्माने एक बळी टिपला. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स ः 20 षटकात 8 बाद 153 (क्विन्टॉन डी कॉक 37 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 46, दीपक हुडा 28 चेंडूत 34, चमीरा 10 चेंडूत 17. अवांतर 12. कॅगिसो रबाडा 4-38, राहुल चहर 2-30, संदीप शर्मा 1-18).
पंजाब किंग्स ः 20 षटकात 8 बाद 133 (जॉनी बेअरस्टो 28 चेंडूत 32, मयांक अगरवाल 17 चेंडूत 25, लियाम लिव्हिंगस्टोन 16 चेंडूत 18, ऋषी धवन 22 चेंडूत नाबाद 21. अवांतर 15. मोहसिन खान 4 षटकात 3-24, दुष्मंता चमीरा 2-17, कृणाल पंडय़ा 2-11, रवि बिश्नोई 1-41).









