वृत्तसंस्था /कोलकाता
कोलकातास्थित आरपी संजीव गोएंका ग्रुपच्या मालकीचा लखनौ सुपर जायंट्स संघ (एलएसजी) शनिवारी कोलकाता येथे होणार असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सविऊद्धच्या त्यांच्या आयपीएल सामन्यात मोहन बागानची हिरवी आणि लाल रंगाची जर्सी परिधान करणार आहे. आयपीएलचा 2022 मध्ये विस्तार होऊन संघांची संख्या 10 वर गेल्यानंतर ‘आरपीएसजी’ समूहाने लखनौ संघ विकत घेतला. तसेच इंडियन सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या मोहन बागान संघाचे ते प्रमुख मालक आहेत. त्यांनी ‘आयएसएल’च्या 2020-21 हंगामापूर्वी मोहन बागानमधील बहुसंख्य हिस्सा खरेदी केला होता. मोहन बागान ही एक संस्था नाही, ती प्रत्यक्षात एक भावना आहे. हा वारसा कोलकाता शहराचे प्रतिनिधीत्व करतो, असे ‘एलएसजी’ संघाचे मालक शाश्वत गोयंका म्हणाले. हे लक्षात घेऊनच आम्ही ठरवले आहे की, एलएसजी शनिवारी ईडन गार्डन्सवर होणार असलेल्या ‘केकेआर’विऊद्धच्या सामन्यात लाल आणि हिरव्या रंगाची जर्सी परिधान करेल. मोहन बागानच्या वारशाचा आणि शहराच्या वारशाचा आदर करण्याचा हा आमचा मार्ग आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. शनिवारी दोन्ही संघ भिडतील तेव्हा प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने दोघांसाठीही विजय अत्यंत गरजेचा राहील. ‘फक्त मोहन बागानचे चाहतेच नव्हे, तर कोलकाता शहरातील सर्व रहिवासी आम्हाला पाठिंबा देतील अशी आशा आहे. कोलकाता हे आमचे घर आहे. त्यामुळे आम्हाला जेवढा पाठिंबा मिळणे शक्य आहे तेवढा आम्ही मागू’, असे गोयंका पुढे म्हणाले. ‘आरपीएसजी हाऊस’ येथे हंगामी कर्णधार कृणाल पंड्या आणि यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरन यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.








