आयपीएल : विजयासह लखनौने शेवट केला गोड : मिचेल मार्शची 117 धावांची तुफानी खेळी : गुजरातचा 33 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी गुजरात टायटन्सला पराभूत केले. मिचेल मार्शच्या वादळी शतकाच्या जोरावर लखनौने 2 बाद 235 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला 9 बाद 202 धावापर्यंत मजल मारता आली. दरम्यान, गुजरातचा या पराभवामुळे क्वालिफायर 1 मधील प्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (25 मे) विजय मिळवावा लागणार आहे. तसे न झाल्यास पंजाब किंग्स व आरसीबी यांना क्वालिफायर 1 मधील जागा पक्की करण्याची संधी मिळेल.
प्रारंभी, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि एडन मार्करमची जोडी मैदानावर आली. गुजरातच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांना सुरूवातीला धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे लखनौचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी कागिसो रबाडा गोलंदाजीला आला. या षटकात लखनौच्या फलंदाजांनी 15 धावा चोपल्या. इथून लखनौच्या फलंदाजांनी धावसंख्या 53 धावांवर पोहोचवली.
मार्शची तुफानी शतकी खेळी
मार्श व मार्करम जोडीने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान, मार्करमला 36 धावांवर साई किशोरने बाद करत ही जोडी फोडली. मार्करम बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने मार्शला चांगली साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. मार्शने शानदार शतकी खेळी साकारताना 64 चेंडूत 10 चौकार व 8 षटकारासह 117 धावांची खेळी साकारली. पूरनने त्याला चांगली साथ देताना 27 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह नाबाद 56 धावांचे योगदान दिले. शतकानंतर मात्र मार्श अर्शद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने 16 धावा केल्या. या जोरावर लखनौने 20 षटकांत 2 गडी गमावत 235 धावा केल्या.
गुजरातच्या पदरी निराशा
लखनौने विजयासाठी दिलेल्या 236 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. सलामीवीर साई सुदर्शन 21 धावा काढून बाद झाला. स्टार फलंदाज शुभमन गिलने 20 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. फटकेबाजीच्या प्रयत्नात गिल आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. 18 चेंडूंत 33 धावा करणाऱ्या जोस बटलरचा त्रिफळा उडवून आकाश सिंगने जोरदार सेलिब्रेशन केले. बटलर बाद झाला तेव्हा गुजरातच्या 3 बाद 96 धावा झाल्या होत्या आणि त्यांना 63 चेंडूंत 140 धावा करायच्या होत्या. मोहम्मद शाहरुख खान व शेर्फाने रुदरफोर्ड यांनी अर्धशतकी भागीदारी करून गुजरातच्या आशा जिवंत ठेवल्या. पण, रुदरफोर्डला 38 धावांवर ओरुरकेने तंबूचा रस्ता दाखवला. शाहरुख खानने 29 चेंडूत 57 धावांची आक्रमक खेळी केली.
आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला परदेशी खेळाडू
गुजरातविरुद्ध शतक मिचेल मार्शसाठी अतिशय खास ठरले आहे. याआधी आयपीएल 2025 स्पर्धेत सहा फलंदाजांनी शतक झळकावली होती. हे सर्व भारतीय फलंदाज होते. मिचेल मार्श हा आयपीएल 2025 स्पर्धेत शतक झळकावणारा सातवा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, तो या हंगामात शतक झळकावणारा पहिलाच परदेशी फलंदाज ठरला आहे. मार्शने या डावात फलंदाजी करताना 64 चेंडूत 117 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 2 बाद 235 (मार्करम 36, मिचेल मार्श 64 चेंडूत 10 चौकार व 8 षटकारासह 117, निकोलस पूरन नाबाद 56, ऋषभ पंत नाबाद 16, अर्शद खान व साई किशोर प्रत्येकी 1 बळी) गुजरात टायटन्स 20 षटकांत 9 बाद 202 (साई सुदर्शन 21, शुभमन गिल 35, जोस बटलर 33, रुदरफोर्ड 38, शाहरुख खान 57, ओरुरके 3 बळी, आवेश खान व आयुष बडोनी प्रत्येकी दोन बळी)










