समन्स आणि 200 रुपयांचा दंड रद्द करण्याची मागणी फेटाळली
वृत्तसंस्था/ लखनौ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लखनौ उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. वीर सावरकरांवरील कथित वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात लखनौच्या सत्र न्यायालयाने जारी केलेले समन्स आणि 200 रुपयांचा दंड रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने त्यांनी दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळत ‘पर्यायी उपाय’ अवलंबण्याचा किंवा थेट सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
राहुल गांधी यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे पत्रकार परिषदेत वीर सावरकरांना ब्रिटिशांचे सेवक आणि पेन्शनधारक असे संबोधले होते. यासंबंधी वकील नृपेंद्र पांडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने हे विधान देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राहुल गांधी यांचे वकील प्रांशू अग्रवाल यांनी दंड आणि समन्स रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता दुसरा कायदेशीर पर्याय स्वीकारण्याची तयारी करत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.









