वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने बेल्जियमच्या आर्टर लुकास यांची वरिष्ठ आणि कनिष्ठ संघांसाठी प्रशिक्षक तथा व्हिडीओ विश्लेषक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या करारानुसार, लुकास बेंगळूर येथील साई केंद्रात चारही भारतीय हॉकी संघांसोबत काम करतील. यात वरिष्ठ पुरुष, वरिष्ठ महिला, कनिष्ठ पुरुष आणि कनिष्ठ महिला संघांचा समावेश असेल.
लुकास यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. या बेल्जियन नागरिकाने यापूर्वी रॉयल बेल्जियम हॉकी असोसिएशनसाठी 2018 ते 2023 या कालावधीत 18 वर्षांखालील राष्ट्रीय संघाचे कामगिरी विश्लेषक म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संघाच्या विकासात आणि यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गेल्या वर्षी त्यांनी बेल्जियमसाठी विश्लेषणात्मक सल्लागार म्हणूनही काम केले. लुकास हे 2017 पासून ‘केएचसी ड्रॅगन्स’चे कार्यप्रदर्शन विश्लेषक म्हणून ते मुख्य भूमिकेत दिसले आहेत. सदर क्लब हा बेल्जियमच्या आघाडीच्या हॉकी क्लबांपैकी एक आहे. 2015 ते 2021 पर्यंत लुकास व्हिक्टोरिया हॉकी क्लबशी युवा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक अशा विविध भूमिकांमध्ये संबंधित राहिले.









