तमिळ नेते पाझा नेदुमारन यांचा दावा ः लवकरच सर्वांच्या समोर येणार
वृत्तसंस्था/ चेन्नई
एलटीटीई प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा तामिळनाडूतील पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ तमिळचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी सोमवारी केला आहे. प्रभाकरन जिवंत असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे. माझ्या या वक्तव्यामुळे त्याच्या मृत्यूसंबंधीच्या अफवा थांबतील असा आम्हाला विश्वस आहे. प्रभाकरन लवकरच जगासमोर येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रभाकरनला 18 मे 2009 रोजी श्रीलंका सरकारने मृत घोषित केले होते. 17 मे 2009 रोजी श्रीलंकेच्या उत्तर भागात सैन्याच्या कारवाईदरम्यान प्रभाकरन मारला गेला होता असे तेथील सरकारने म्हटले होते. तसेच दुसऱया दिवशी त्याचा मृतदेह श्रीलंकेतील प्रसारमाध्यमांमध्ये दाखविण्यात आला होता. एका आठवडय़ाने एलटीटीईचे प्रवक्ते सेल्वारासा पथ्मनाथन यांनी याची पुष्टी केली होती. तर काही दिवसांनी डीएनए चाचणीनंतर हा मृतदेह प्रभाकरन याचाच असल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान त्याचा पुत्र एंथनी चार्ल्सचाही मृत्यू झाला होता.
प्रभाकरनच्या कुटुंबाकडूनच माहिती
प्रभाकरनच्या कुटुंबाचे सदस्य माझ्या संपर्कात आहेत. त्यांनीच प्रभाकरन सुखरुप असल्याचे सांगितले आहे. एलटीटीई नेत्याच्या सहमतीनेच तो जिवंत असल्याची माहिती उघड करत असल्याचे नेदुमारन यांनी म्हटले आहे. श्रीलंकेत राजपक्षे यांच्या विरोधात सिंहली जनता रस्त्यांवर उतरल्याने प्रभाकरन सर्वांसमोर येऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील ईलम तमिळ (श्रीलंकेतील तमिळ) आणि तमिळांनी प्रभाकरनला पूर्ण समर्थन देण्यासाठी एकजूट व्हावे. तामिळनाडू सरकार, पक्ष आणि तामिळनाडूतील जनतेनेही प्रभाकरन याच्यासोबत उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
आम्ही चौकशी करू
प्रभाकरन जिवंत असल्याच्या दाव्यावरून श्रीलंकेच्या सरकारने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विदेश मंत्रालय या दाव्याची पडताळणी करणार असल्याचे विदेशमंत्री अली साबरी यांनी सांगितले आहे.
लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम
एलटीटीई ही श्रीलंकेतील उग्रवादी संघटना आहे. श्रीलंकेत तमिळांसाठी स्वतंत्र देशाची मागणी या संघटनेकडून करण्यात येत होती. प्रभाकरन या हा संघटनेचा म्होरक्या होता. या संघटनेच्या कारवायांमध्ये श्रीलंकेने अनेक महत्त्वाचे नेते गमाविले आहेत. एलटीटीईमुळे श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू झाले होते. यादरम्यान तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी 29 जुलै 1987 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता करार झाला होता. या करारानुसार त्याचवर्षी भारताने स्वतःचे सैन्य श्रीलंकेत पाठविले होते. भारताच्या या निर्णयामुळे एलटीटीईचा संताप झाला होता. एलटीटीईने यातूनच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली होती.









