प्रतिनिधी/ बेळगाव
एलअॅण्डटी कंपनीकडून शहरात जलवाहिन्या घालताना चक्क गटार फोडून जलवाहिनी घालण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी उड्डाणपुलाखाली गटार अर्धवट फोडून जलवाहिनी घालण्यात आली आहे. यामुळे गटारीचे पाणी साचून तानाजी गल्ली, महाद्वार रोड परिसरात सांडपाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलवाहिन्या घातल्या जात आहेत. परंतु कोणतेही नियोजन नसताना अधिकाऱ्यांच्या मनाला वाटेल तेथून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. रस्त्यांची खोदाई करून सर्वत्र चिखल साचला असल्याने नागरिकांना यातूनच ये-जा करावी लागत आहे. एलअॅण्डटीच्या त्रासाने नागरिक वैतागले आहेत. आता गटार फोडून पाईप घातल्याने संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उ•ाणपुलाखाली जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जलवाहिनी घालताना गटारीखालून घालणे गरजेचे होते. परंतु श्रम वाचविण्यासाठी गटार फोडून पाईप घालण्यात आली. त्यामुळे महाद्वार रोड येथील सांडपाणी याठिकाणी अडकले जाणार असून भविष्यात महाद्वार रोड परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिसरातच रेणुका देवीचे मंदिर असल्याने दररोज भाविकांची ये-जा असते. याठिकाणी सांडपाणी साचल्यास मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
जलवाहिनी घालताना नाल्याचेही नुकसान
धारवाड रोड येथे जोडण्यात आलेल्या नाल्याचेही नुकसान जलवाहिनी घालताना करण्यात आले आहे. नाल्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास यातून पाणी ओव्हरफ्लो होऊन परिसरात सांडपाणी पसरण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे. किमान स्थानिक नगरसेवकांनी तरी जलवाहिनीचे काम करताना लक्ष पुरवावे, अशी मागणी केली जात आहे.









