बेळगाव / प्रतिनिधी : बेळगाव येथील इन्फन्ट्री स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी. एन. अनंतनारायण यांनी सोमवारी लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट दिली. गुरूवार पेठ, टिळकवाडी येथील कार्यालयाला भेट देवून त्यांनी सोसायटीविषयी माहिती जाणून घेतली. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांनी अनंतनारायण यांचा सत्कार केला.
लेफ्टनंट जनरल पी. एन. अनंतनारायण म्हणाले, 1985 मध्ये यंग ऑफिसर्स कोर्ससाठी बेळगावमध्ये आलो तेव्हापासून या शहराच्या प्रेमात आहे. बेळगावला नैसर्गिक वरदान मिळाले असल्याने येथे काम केल्यामुळे एक समाधान मिळते. देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असून आपली वैयक्तीक महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून देशाचा विचार प्रथमता करावा. जात, धर्मापलिकडे जावून आम्ही भारतीय आहेत हि मूल्ये रूजवली तर देशाची प्रगती दूर नाहि, असे विचार त्यांनी मांडले.
किरण ठाकूर यांनी अनंतनारायण यांचे स्वागत करत सोसायटीला भेट दिल्याबद्दल आभार मानले. बेळगाव हे एक थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटीशांना या शहराचे आकर्षण असल्यामुळे मराठा लाईट इन्फन्ट्री येथे आणण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बेळगावचे योगदान महlवाचे आहे. तरूण भारतचा स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीईओ अभिजित दिक्षित यांनी स्वागत केले. निवृत्त कर्नल दिपककुमार गुरूंग यांनी आभार मानले. सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक डी. पी. वागळे, सुबोध गावडे यांच्यासह लोकमान्य सोसायटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.